भाजपची ‘बुरखा ब्रिगेड’ तयार
मिशन 400 साठी अल्पसंख्याक मोर्चाकडून नियोजन
नवी दिल्ली
देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याची घोषणा केली आहे.
त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारीदेखील सुरु केली आहे. भाजपकडून रणनिती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली असून भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिम महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे.
मतदानाच्या दिवशी भाजप मुस्लिमबहुल भागातील बुथवर बुरखाधारी महिला तैनात करणार आहे. या बुरखाधारी महिला भाजपच्या पोलिंग एजंट म्हणून काम करतील. मतदानादरम्यान होणाऱी फसवणूक रोखण्याचं काम या महिला करतील. मतदानाच्या दिवशी मुस्लिमबहुल भागात महिला बुरखा घालून मतदानासाठी येतात. याचा फायदा काही नतद्रष्ट लोकांकडून घेतला जातो. बुरख्याच्या आडून बनावट मतदान होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे बनावट मतदान रोखण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा वेगळा प्रयोग आहे. आणि हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.यासाठी 10-10 महिलांचा ग्रुप बनवला जात असून त्यांना पोलिंग एजंटचं प्रशिक्षण दिलं जात आहे. पोलिंग बूथवर बनावट मतदार ओळखायचे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने बनावट मतदान रोखण्याचं या ब्रिगेडचं काम असणार आहे.मोदी सरकारच्या विविध योजना आणि कामावर खुश होऊन मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग मोदी सरकारबरोबर येईल असा विश्वास भाजपाला आहे. विशेष मुस्लीम महिलांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.मुस्लीम समाजाचा वाढता पाठिंबा पहाता काही समाजकंटकांकडून मतदान रोखण्याचा किंवा बोगस मतदानाचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे बोगस मतदान रोखण्यसाठी बुरखाधारी महिलांचं पथक तयार करण्यात आलं आहे. याची जबाबादीर भाजप अल्पसंख्याक मोर्चाला देण्यात आली आहे.
