रहिमतपूरमध्ये कवी गिरीश जयंती उत्साहात साजरी
कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रामध्ये कार्यक्रम
सातारा
श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रामध्ये सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी कवी गिरीश यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्यवाह व लोकमंगल शिक्षण संस्था साताराचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य विनोद कुलकर्णी उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूरचे माजी कार्याध्यक्ष प्रा.प्रकाश बोधे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते निसर्ग कवी गिरीश यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मा.विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हसत खेळत चे संपादक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूर चे कार्याध्यक्ष रुपेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
लोकमंगल शिक्षण संस्था साताराचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले जयंती पुण्यतिथी यामुळे आपण साहित्यिक दृष्ट्या समृद्ध होत असतो. कवी गिरीश यांच्या स्मारकामुळे सर्वजण समृद्ध होत आहात ही एक प्रकारची आपल्याला मिळालेली संधीच आहे. या संधीचा फायदा आपण सर्वांनी करून घ्यावा. तसेच वसंत कानेटकर यांचा जन्मशताब्दी सांगता समारंभ पुण्यामध्ये व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारमूर्ती म्हणून मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य विनोद कुलकर्णी यांनी सातारमध्ये शाहूपुरीमधील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या कामाची व साहित्य क्षेत्रासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा याविषयीची माहिती दिली.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रुपेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा असून तो साहित्यिकांचाही जिल्हा आहे .या सातारा जिल्ह्यातून अनेक साहित्यिक घडावेत.
प्रकाश बोधे यांनी मनोगत व्यक्त करताना साहित्याचे वेड आपण सर्वांनी आवडीनिवडी सवडीप्रमाणे जपावे व साहित्य क्षेत्रात आपली कामगिरी करावी असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने , महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूरचे कार्याध्यक्ष रुपेश जाधव , माजी कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश बोधे, सौ सुमन परशराम फडतरे माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक दादासाहेब जगताप ,श्री कोल्हेश्वर विद्यालय तांदुळवाडी मंगळापूरचे मुख्याध्यापक सत्यवान शिर्के , न्यू इंग्लिश स्कूल चंचळीचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र वाघ, सौ. सुमन परशराम फडतरे प्राथमिक प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मेघा गायकवाड , गुरुकुल अकॅडमी रहिमतपूरच्या मुख्याध्यापिका सौ. यास्मिन मुजावर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अरुण माने यांनी केले. यामध्ये त्यांनी रहिमतपूर मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबरच नाट्य परिषदेचे शाखा व्हावी यासाठी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी सौ. स्वाती जाधव यांनी कवि गिरीश यांच्या ‘सोनेरी चांदणे ‘या काव्यसंग्रहाचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विजया शेडगे यांनी केले , तर आभार प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा गायकवाड यांनी मानले

