लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,संगमवाडी येथे स्मारकाचे भूमिपूजन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Advertisement

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविक केले. साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून स्मारकाच्या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात म्युझिअम, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. नगर नियोजन योजने अंतर्गत उरळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!