निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
मुंबई
राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (कनिष्ठ आणि वरिष्ठ) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 1 मार्च 2024 पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना 10 हजार रुपये वाढ करण्यात येईल.
धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णयहि आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.सध्या 5500 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. ही संख्या वाढवून आता दरवर्षी 10 हजारापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येईल. यासाठी येणाऱ्या 114 कोटी 45 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा लाभ कर्मचा-यांना 1 एप्रिल,2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
