साधना स्कूलमध्ये राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा


सातारा :
यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. दशरथ सगरे सर यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे 79 वा राष्ट्रीय छात्र सेना (NCC) दिवस मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्यातील संदीप फायर सर्व्हिसेसचे संचालक श्री. संदीप खटमोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धुमाळे होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि यशोदा गीत सादर करण्यात आले. यावेळी NCC कॅडेट्सनी शिस्त आणि समर्पणाच्या भावनेतून राष्ट्रसेवेची शपथ घेतली.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे NCC कॅडेट्सनी सादर केलेली विविध साहसी आणि कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके. यामध्ये पारंपरिक दांडपट्टा प्रात्यक्षिक, फ्लॅग एरिया, NCC प्रदर्शन, सायलेंट ड्रिल, ॲम्बुश प्रात्यक्षिक आणि अग्निशमन प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
सायलेंट ड्रिलच्या माध्यमातून कॅडेट्सनी शारीरिक समन्वय, एकाग्रता, आत्मविश्वास, शिस्त आणि रायफल हाताळण्याच्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. दांडपट्टा प्रात्यक्षिकातून महाराष्ट्राच्या पारंपरिक युद्धकलेचे दर्शन घडवण्यात आले. तर ॲम्बुश आणि फ्लॅग एरिया उपक्रमांतून निरीक्षणशक्ती, सतर्कता आणि सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.अग्निशमन प्रात्यक्षिक हे कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरले. यामध्ये आग विझवण्याच्या विविध पद्धती, सुरक्षिततेचे उपाय तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखण्याचे महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शाळेच्या NCC विभागामार्फत वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे छायाचित्र प्रदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली पोस्टर्सही यामध्ये प्रदर्शित करण्यात आली. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कलात्मक कौशल्य आणि NCC उपक्रमांमधील सक्रिय सहभाग दिसून आला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास, सांघिक भावना, स्वावलंबन आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे सर यांची प्रेरणा लाभली. तसेच २२ महाराष्ट्र बटालियन NCC, सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले यांच्या मार्गदर्शनामुळे कॅडेट्सना विशेष प्रेरणा मिळाली. NCC अधिकारी S/O निलिका पाटील आणि प्रशिक्षक सुमित पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. कॅडेट्सनी सादर केलेली विविध प्रात्यक्षिके, त्यामागील मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सांघिक समन्वय पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कॅडेट्सच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रशंसा मिळाली.
कार्यक्रमाची सांगता NCC गीताने करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!