रवींद्र बेडकिहाळ यांना गुंफण जीवनगौरव पुरस्कार जाहीर
सातारा,
फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सीताराम बेडकिहाळ यांना मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गुंफण जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अकादमीचे प्रमुख डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पत्रकारिता, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात बेडकिहाळ यांनी केलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रवींद्र बेडकिहाळ गेली ५८ वर्षे पत्रकारिता व लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक संध्या, नवशक्ती, केसरी, लोकसत्ता, लोकमत, ग्रामोद्धार, तरुण भारत (बेळगाव) आदी वृत्तपत्रांतून पत्रकारिता केली आहे. १९८१ पासून त्यांनी स्वतःचे ‘लोकजागर’ साप्ताहिक नियमितपणे सुरू ठेवले असून त्याचा स्वतंत्र दिवाळी अंकही गेली ४५ वर्षे प्रकाशित होत आहे. पत्रकारितेबरोबरच साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यातील अनेक आपद्ग्रस्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकारांसाठी आरोग्य योजना, मोफत उपचार आणि निवृत्तिवेतनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहेत.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा प्रसार आणि गौरव करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. विशेषतः जांभेकर यांच्या चरित्रग्रंथाचे लेखन त्यांनी केले असून या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘दर्पण’कारांच्या जन्मगावी स्मारक उभारणी, सभागृह निर्मिती आणि त्यांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले. ग्रामीण भागात साहित्य संमेलने आयोजित करण्यासाठी ‘शिवार’ साहित्य संमेलनाची संकल्पना राबविली. याशिवाय व्याख्याने, लेखन, कथा, कविता, मुलाखती आणि विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या विविधांगी कार्याची दखल घेत त्यांना आजवर शंभरहून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
गुंफण अकादमी, मसूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ व १३ डिसेंबर रोजी मसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बाविसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी, साहित्यसेवा आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी केलेले कार्य या सर्वांचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

