पुस्तके ही माणसाची खरी समृद्धी:अभिजीत बेल्हेकर
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे चतुर्थ साहित्य संमेलन
सातारा,
“पुस्तके केवळ माहिती देण्याचे साधन नसून ती माणसाची वैचारिक जडणघडण करून त्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात. संगणकाच्या सीपीयूमध्ये सॉफ्टवेअर भरल्याशिवाय तो चालू शकत नाही; त्याचप्रमाणे माणसाच्या मेंदूच्या विकासासाठी योग्य वैचारिक ‘इनपुट्स’ची गरज असते,” असे प्रतिपादन दैनिक लोकसत्ता पुणेचे वरिष्ठ सहसंपादक अभिजीत बेल्हेकर यांनी येथे केले.
‘आम्ही पुस्तक प्रेमी समूह, सातारा’ आयोजित चतुर्थ साहित्य संमेलन “वाचनातून समृद्धी” या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कै. शिवाजीराव भोसले साहित्यनगरी, कै. मधुसूदन नेने व्यासपीठ येथे हॉटेल निवांत, यवतेश्वर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
आज सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे माहितीचा प्रचंड स्फोट झाला असून, निव्वळ माहिती गोळा करण्यालाच ज्ञान मानण्याची चूक होत असल्याचे बेल्हेकर यांनी स्पष्ट केले. “मिळालेल्या माहितीवर आणि अनुभवांवर मेंदूमध्ये मंथन व प्रक्रिया होऊन स्वतःचे मत तयार होणे, हाच ज्ञानाकडे जाणारा खरा मार्ग आहे. प्रत्यक्ष अनुभूती आणि वाचन हे जग समजून घेण्याचे दोन मूलभूत मार्ग असून, पुस्तकांमुळे जगभरातील अनुभव सहज उपलब्ध होतात,” असे ते म्हणाले.
मोबाईल किंवा स्क्रीनवर वाचलेली माहिती काही मिनिटांत विसरली जाऊ शकते; परंतु कागदावरील पुस्तक वाचताना मेंदू आणि डोळ्यांचे कायमस्वरूपी नाते तयार होते, असे सांगून बेल्हेकर यांनी कागदी पुस्तकांचे स्थान अढळ असल्याचे नमूद केले. “पुस्तक वाचताना वाचक त्या जगात पूर्णपणे रमून जातो आणि त्याच्या मनात समांतर पातळीवर चिंतन-मंथन सुरू राहते. आजच्या धावपळीच्या आणि गोंधळाच्या वातावरणात पुस्तक हे माणसाचा खरा मित्र आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत ठरते,” असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी लेखक आणि संपादक (राजहंस प्रकाशन, पुणे) डॉ. सदानंद बोरसे होते. “पुस्तक म्हणजे केवळ पुठ्ठा आणि कागदांची निर्जीव वस्तू नसून, लेखक आणि वाचक यांनी परस्पर संमतीने केलेला एक रंजक सहप्रवास असतो. वाचनाचा खरा खेळ सुरू होण्यासाठी लेखक आणि वाचक दोघांची भाषिक व वैचारिक क्षमता किमान समान पातळीवर जुळणे आवश्यक असते,” असे ते म्हणाले.
“एक वाचक कधीही तेच पुस्तक दुसऱ्यांदा वाचू शकत नाही; कारण पहिल्या वाचनानंतर वाचकामध्ये वैचारिक बदल घडून येतो आणि दुसऱ्यांदा तेच पुस्तक वाचताना तो ‘बदललेला वाचक’ असतो. वाचनातून मिळणारा आनंद, प्रगल्भता आणि समृद्धी ही केवळ पुस्तकावर अवलंबून नसून, ते पुस्तक वाचणाऱ्याची ‘नजर’ आणि विचारसरणी किती प्रगल्भ आहे यावर अवलंबून असते,” असे डॉ. बोरसे यांनी स्पष्ट केले. पुस्तकांचे परीक्षण किंवा रसग्रहण हे अन्न पचवणाऱ्या औषधासारखे काम करते, असे सांगून त्यांनी अभिजीत बेल्हेकर यांचा ‘करते सुधारक आणि करता संशोधक’ असा गौरव केला.
समूहाची संकल्पना, स्थापना व वाटचाल याविषयी बोलताना प्रसिद्ध लेखक डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, “‘आम्ही सातारकर पुस्तकप्रेमी’ समूहाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून, २७० पेक्षा जास्त आठवडे दररोज एका नव्या पुस्तकाचा परिचय करून देत तब्बल २००० हून अधिक पुस्तकांची ओळख वाचकांना करून दिली आहे. साताऱ्यातून सुरू झालेला हा समूह आज महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि परदेशातही पोहोचला असून त्याचे सुमारे ४०० सदस्य झाले आहेत.”
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी म्हणाले, “चॅटजीपीटी किंवा सोशल मीडियावरून मिळणारी प्रत्येक माहिती खरी असेलच याची शाश्वती नसते. साताऱ्यात प्रत्यक्षात न झालेल्या ‘नांदी संमेलना’चा एआयने दिलेला खोटा संदर्भ हे याचे उत्तम उदाहरण आहे. डिजिटल मीडिया आणि यूट्यूब कितीही प्रभावी झाले तरी, खऱ्या वस्तुस्थितीचे ज्ञान मिळवण्यासाठी आजही पुस्तके आणि वर्तमानपत्रे हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे.”
यापूर्वी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन युनायटेड वेस्टर्न बँक सातारा येथील माजी सरव्यवस्थापक सदाशिव क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद फडके यांनी केले तर आभार श्रीकांत कात्रे यांनी मानले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिरीष चिटणीस व श्रीराम नानल उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी पुस्तकप्रेमी समूहाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

