एक किलो गव्हाच्या पिठासाठी 800 रुपये


पाकिस्तानमधील महागाईने गाठले टोक

Advertisement

मुंबई
जगभरात महागाई झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशातच आता पाकिस्तानात महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे.कराचीमध्ये सध्या एक किलो गव्हाच्या पीठाची किंमत 800 पाकिस्तानी रुपये आहे. यापूर्वी ते 230 रुपयांना मिळत होते. या रक्कम भारतीय चलनात परावर्तीत केली तर 800 पाकिस्तानी रुपये हे 238 भारतीय रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजेच पाकिस्तानात एक किलो गव्हाचे पीठ 238 रुपयांना मिळते. हेच पीठ भारतात केवळ 50 रुपये किलोने मिळते. महागाई वाढली असल्याने पाकिस्तानात एका चपातीची किंमत 25 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
कराचीमधील एका दुकानदाराने सांगितले की, ‘खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असल्याने आम्ही आमच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, आम्ही चुकीच्या लोकांना मतदान केले. ते आमच्या गरजांकडे लक्ष न देता मजा करत आहेत.’ दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की, ‘मूलभूत गोष्टी आमच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. अगोदर गव्हाचे पीठ 230 रुपये किलोने मिळत होते, आता त्याची किंमत 800 रुपयांच्या पुढे गेली आहे. आता रोज 500 रुपये कमावणारी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी रोज जेवणाची व्यवस्था कशी करणार? असा सवाल उपस्थित केला.
पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड महागाई आहे. देशात महागाई दर 38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दरही 48 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, शहरी भागात टोमॅटोच्या किमती 188%, कांदा 84%, भाज्या 55%, मसाले 49%, गूळ 44%, साखर 37% वाढल्या आहेत. तसेच गॅसच्या किमती 319%, वीज 73%, फर्निचर 22% आणि पुस्तकांच्या किमती 34% पेक्षा जास्त वाढल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये महागाई वाढण्याचे कारण म्हणजे, देशावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर आणि अर्थव्यवस्थेची मंद गती हे आहे. तसेच पाकिस्तानी चलन एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक कमकुवत झाले आहे. त्याचा परिणामही महागाईवर होत आहे. या महागाईवर भाष्य करताना जागतिक बँकेने म्हटले की, 1 कोटी लोक दारिद्र रेषेखाली ढकलले जाऊ शकतात. दरम्यान आधीच पाकिस्तानची सुमारे 10 कोटी लोकसंख्या गरिब आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!