लाल माती गहिवरली


क्रीडा महर्षी बबनराव उथळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विशेष लेख/शरद महाजनी

Advertisement

आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो नि पावले दारातच थबकली. आजची सकाळ ‘शुभ सकाळ ‘ नाही याचे संकेत जणू या पावलांनी दिले.सकाळी पत्रकार मित्र विजय मांडके याचा व्हॉटस ॲप मेसेज आला.. क्रीडा महर्षी बबनराव उथळे यांचे निधन.मी पुन्हा फेस बुक पाहिले, तिथेही तीच बातमी होती.सातारला 15 दिवस असताना खूप जुने मित्र भेटले,काहींची भेट राहून गेली,मनात असूनही.त्यातली एक भेट राहिली ती अण्णा उथळे यांची…..
सुमारे 50 हून अधिक वर्षांचा त्यांचा परिचय. त्यातील पत्रकार म्हणून ओळख 40 वर्षांची.पण त्याआधी त्यांना अनेकदा भेटलो तो शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर.. देवाआधी ज्यांना वंदन करावे अशी माणसे आयुष्यात भेटली, त्यातील अण्णा एक.कधीही भेट झाली की सुहास्य वदने स्वागत, जय शिवराय असे म्हणत वाकून केलेला नमस्कार, पाठोपाठ अण्णांची पाठीवर पडणारी कौतुकाची थाप..
गुरुवर्य क्रीडा महर्षी
क्रीडा क्षेत्रात देदिप्यमान कार्य करणारा,उत्तुंग भरारी घेऊन पाय जमिनीवर असणारा, गुरुवर्य ही पदवी सार्थ ठरवणारा क्रीडा महर्षी ही अण्णांची ओळख.गेली काही वर्षे सोडली तर मंडळाच्या मैदानावर ते हमखास हजेरी लावत,त्या लाल मातीशी एकरूप होऊन सर्वांना प्रेरणा, चैतन्य,ऊर्जा आणि आशीर्वाद देणारे अण्णा मी पाहिले आहेत. अण्णांनी घडवलेले विजय जाधव,कुमार कुलकर्णी,प्रमोद देशपांडे हे माझे शाळकरी मित्र.पण शेकडो शिष्य तयार करून ,त्यांना नावारूपाला आणणारे अण्णा मी जवळून पाहिले ते क्रीडा पत्रकार म्हणून.सर्वाधिक शिव छत्रपती पुरस्कार मिळवत साताऱ्याचा झेंडा अटकेपार फडकविणारे खेळाडू अण्णांच्या मुशीत घडले. कबड्डी या खेळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे,देशी खेळांचा प्रसार, प्रचार करून या खेळांना मान सन्मान मिळवून देणारे अण्णा सर्वार्थाने क्रीडा महर्षी. केवळ दर्जेदार खेळाडू घडवणे हे एकच ध्येय उराशी बाळगून सतत कार्य करणारे अण्णा सुसंस्कार,शिस्त यालाही तेवढेच महत्व देत.त्यामुळे या मंडळाचा खेळाडू देशाच्या काना- कोपऱ्यात गेला तरी मंडळाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो.
शिस्त, वक्तशीरपणा
क्रीडा संघटक म्हणून अण्णांची वेगळी ओळख आहे ती त्यांच्या कार्यपद्धतीमुळे.शिस्त, वक्तशीरपणा हे तर त्यांच्या रक्तात भिनले होते,तोच संस्कार त्यांनी हजारो खेळाडूंना दिला. कबड्डी,खो खो या खेळात मुलांना आणि मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रवीण करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून सातारकर क्रीडाप्रेमी नागरिकांना दर्जेदार खेळाचे दर्शन घडावे या बरोबरच आपल्या खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत नामांकित खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.सर्व सहकारी,समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि खेळाडू यांच्याशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे,प्रेमाचे नाते जपत त्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीची दखल घेत त्यांचा
खेळाडूंना प्रेरणा, चैतन्य, ऊर्जा
‘शिव छत्रपती पुरस्कार ‘ प्रदान करून केलेला सन्मान हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.त्याचे ते खरे हकदार होत.पण या पुरस्कारांपेक्षा सतत मैदानावर राहून खेळाडूंना प्रेरणा, चैतन्य, ऊर्जा देणारे अण्णा मनाला अधिक भावतात.
पत्रकार म्हणून त्यांना भेटण्याचा योग खूपदा जुळून आला.तेव्हा त्यांची असलेली तळमळ अनुभवता आली.खेळ,खेळाडू यांच्या विकासासाठी त्यांच्या मनात असलेले विचार जाणून घेता आले. खेळाप्रति एवढी निष्ठा,प्रेम, आपुलकी असलेला ,सर्वस्व अर्पण करून कार्यरत असलेला माणूस मी जवळून पाहिला.
अण्णा मार्गदर्शक म्हणून किती मोठे होते हे त्यांच्या सामाजिक कार्यातून दिसून येते.समाजाच्या सर्व थरांतील लोकांशी असलेली त्यांची जवळीक ,समाजात त्यांना असणारा मान ही त्यांनी आयुष्यात मिळवलेली खरी कमाई होय.राजकारण, समाजकारण पण त्यांनी केले.पण तत्त्वाशी तडजोड न करता.आदर्शवाद जोपासून.सर्वार्थाने सातारा भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णांची आठवण कोणीही विसरू शकणार नाही.त्यांच्या विषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करून त्यांना अपेक्षित कार्य करणारे त्यांचे अनुयायी यापुढेही कार्यरत राहतील हा विश्वास आहे.लाल मातीशी एकरूप झालेला, आयुष्यभर या मातीशी इमान राखणारा खूप मोठा माणूस देहरूपाने आपल्यात नसला तरी हिमालयाएवढे उत्तुंग कार्य करणारा हा महान कर्मयोगी सर्वांच्या मनात कायम स्वरुपी स्मरणात राहील यात शंका नाही.

-शरद महाजनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!