संगीतरचनांतील वैविध्य हे शंकर-जयकिशन यांचे वैशिष्ट्य
गोल्डन हिट्स ऑफ शंकर- जयकिशन कार्यक्रमात स्वप्निल पोरे यांचे प्रतिपादन
पुणे : संगीतरचनांमधील वैविध्यामुळे शंकर- जयकशिन यांनी श्रोत्यांच्या अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवले, असे मत चित्रपट अभ्यासक व लेखक स्वप्निल पोरे यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि विजय साबळे यांच्या वतीने पुण्यातील अक्षरवेल सभागृहात गोल्डन हिट्स ऑफ शंकर- जयकिशन हा गाण्यांचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, कुपर इंडस्ट्रीजच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख नितीन देशपांडे, स्तंभलेखक व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक – अध्यक्ष शिरीष चिटणीस, कवयित्री मृणाल जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख डॉ. संदीप सांगळे, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप गरुड यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुनील पटवर्धन, सचिन शेरकर, विजय साबळे, मंजुषा पोतनीस, स्मिता शेरकर यांनी यावेळी शंकर – जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेली अनेक लोकप्रिय गीते सादर केली. साताऱ्यातील या सर्व कलाकारांना उपस्थितांची भरभरुन दाद मिळाली. डॉ. सबनीस, नितीन देशपांडे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
नौशाद, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, खेमचंद प्रकाश असे एकाहून एक दिग्गज संगीतकार असताना शंकर- जयकिशन यांनी केवळ स्वतंत्र स्थान नव्हे तर युग निर्माण केले, असे पोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, चित्रपटातील प्रत्येक गीत लोकप्रिय करण्याची किमया त्यांना साधली होती. शंकर जयकिशन यांचे संगीत म्हणजे चित्रपटाच्या यशाची हमी, हे समीकरण बनले. एवढेच नव्हे तर मनोजकुमार, राजेंद्रकुमार यांच्यासह अनेक कलाकारांच्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा वाटा महत्त्वाचा राहिला. संगीताची निष्ठेने साधना करणारे शंकरजी अतिशय भक्तीभावाने आषाढी वारीत सहभागी होत असत.
संगीतकार शंकर- जयकिशन, त्यांच्या रचना अमर करणाऱ्या लतादीदी, रफी, मुकेश, त्या पिढीतील अन्य कलाकार काळाच्या पडद्याआड गेले, मात्र माधुर्याने ओथंबलेली त्यांची गीते नव्या पिढीसमोर सतत आणून या गीतांना संजीवनी देण्याचे कार्य विजय साबळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत, असे डॉ. सबनीस यांनी नमूद केले. ते म्हणाले, आजच्या काळात अर्थहीन शब्द असलेल्या गाण्यांचा धुमाकूळ असताना त्यावेळच्या शैलेंद्र, हसरत जयपुरी यांच्यासारख्या प्रतिभाशाली गीतकारांची प्रकर्षाने आठवण होते. आजच्या समाजात ताणतणाव आहे, जीवन चिंतेने ग्रासले आहे. या पार्श्वभीमीवर सुवर्णकाळातील गीते मनाला चैतन्य देणारी आहेत. सातारची नाळ पुण्याला जोडणारा हा उपक्रम शिरीष चिटणीस यांच्या पुढाकाराने होत असून तो स्वागतार्ह आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. जुनी गाणी शांततेची अनुभूती देतात, असे ते म्हणाले. दीपाली गीते यांनी सूत्रसंचालन केले.
पंछी बनी उडती फिरु मस्त गगन में, एहसान तेरा होगा मुझपर, ये मेरा दिवानापन हैं, जाओ रे जोगी तुम जाओ रे यांसह असंख्य गाणी सादर करून शंकर-जयकिशन यांना सांगितिक आदरांजली वाहण्यात आली.

