निवृत्तीनंतरच खरे आयुष्य सुरु होते – मुकुंद फडके


लोकमंगल हायस्कूलमधील दिलीप सावंत यांचा सेवापूर्ती समारंभ
सातारा
“नोकरीच्या आयुष्याला एक दिवस पूर्णविराम मिळतो; मात्र निवृत्ती म्हणजे जीवनाचा शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात असते. ज्ञानाच्या महामार्गावरील एका शाळेत तब्बल ३२ वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने सेवा बजावणारे दिलीप सावंत यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ‘मामा’ या शब्दात माया, जिव्हाळा आणि माणुसकी दडलेली आहे. निवृत्तीनंतरच आयुष्याचा खरा अध्याय सुरू होतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त संपादक मुकुंद फडके यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा संचलित लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी येथे शाळेचे शिपाई दिलीप खाशाबा सावंत (सावंत मामा) यांच्या ३२ वर्षांच्या अखंड सेवेनिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. यावेळी संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रमेश महामुलकर व श्रीनाथ सावंत यांनी तबला व पेटीच्या साथीवर स्वागतगीत सादर करून वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर दिलीप सावंत व त्यांच्या सौभाग्यवती निर्मला दिलीप सावंत यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मुकुंद फडके यांनी आपल्या भाषणात सावंत मामांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “एकाच संस्थेत एकाच पदावर ३२ वर्षे सेवा करून निवृत्त होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा कर्मयोग्यांचा समाजाने गौरव करायलाच हवा. जीवनात कधी थांबायचे हेही प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपण घेतलेले शिक्षण आणि आयुष्यातील अनुभव कधीच वाया जात नाहीत.” यावेळी त्यांनी सावंत मामा यांना “आता थांबायचे नाही” हे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले.
यावेळी शिल्पा चिटणीस म्हणाल्या, “शिक्षकांप्रमाणेच शिपाईही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सावंत मामांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून सेवा केली. त्यांच्या कार्याचा ठसा या शाळेच्या इतिहासात कायम राहील.”
अध्यक्षीय मनोगतात शिरीष चिटणीस यांनी सावंत मामांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सावंत मामांचे इंग्रजी हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. त्यांनी केवळ नोकरी केली नाही, तर शाळा आणि संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. या शाळेची सुरुवात त्यांच्या घरातून झाली, ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांनी आपल्या मुलगा आकाश आणि मुलगी आरती यांना उच्च शिक्षण देत आदर्श पालकत्वही निभावले. आज त्यांचा मुलगा संगणक अभियंता आहे. शाळेच्या प्रगतीसाठी खाशाबा सावंत, दिलीप सावंत आणि महामुलकर मामा यांनी घेतलेले कष्ट विसरता येणार नाहीत. ही शाळा केवळ शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांना ध्येय आणि महत्त्वाकांक्षा देते. त्या महत्त्वाकांक्षेला आकार देण्यात शिक्षकांसह सावंत मामांचाही मोठा वाटा आहे.”
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय संदीप शिंदे यांनी दिलीप सावंत यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमानिमित्त सेवानिवृत्त होण्यापेक्षा सेवा प्रवृत्त होणे अधिक चांगले असे सांगितले कार्यालयीन काम करीत असताना वेळेचे अचूक भान असणारी आणि शिक्षणावर नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व असा दिलीप मामांच्या कार्याचा उल्लेख केला त्यांनी सांगितले ते जरी सेवक होते तरी विद्यार्थ्यांच्यावर चांगले संस्कार केलेल्या आहेत.
विजय यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आज जो लोकमंगलचा वटवृक्ष उभा आहे, त्याचे रोप लावण्याचे काम सावंत मामांनी केले आहे. शाळेशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आयुष्यभर जपावेत.”
दत्तात्रय सावंत (पाटील) यांनी शाळेच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “खाशाबा सावंत यांनी शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्याग आणि संघर्षातून ही संस्था उभी राहिली. सुरुवातीच्या काळात इमारतीला पाणी मारण्यापासून विविध कामे सावंत मामांनी एकहाती केली. पहिली सात वर्षे ते एकटेच कार्यरत होते. त्यांनी स्वतःला कधी शिपाई समजले नाही, तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.”
सत्काराला उत्तर देताना दिलीप सावंत म्हणाले, “नोकरीला लागल्यापासून आजपर्यंतचा प्रवास मला शिकवणारा आणि समृद्ध करणारा ठरला. या शाळेने मला प्रेम, स्नेह आणि जीवनाला दिशा दिली. शिक्षक, मुख्याध्यापक, सहकारी आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे माझा ३२ वर्षांचा सेवाप्रवास अविस्मरणीय ठरला.”

Advertisement

प्रास्ताविकात शशिकांत जमदाडे यांनी शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना नमूद केले की, “एका पिशवीतील दप्तरांपासून सुरू झालेली ही शाळा आज मोठ्या उंचीवर पोहोचली आहे. सुरुवातीपासून प्रत्येक छोट्या-मोठ्या कामात सावंत मामांचा सहभाग होता. त्यांच्या सेवाभावामुळे शाळेच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत जमदाडे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत जाधव यांनी, तर आभार नितीनकुमार कसबे यांनी मानले. कार्यक्रमास राहुल घोडके, रमेश महामुलकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, नागेवाडी-कुशी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्ती समारंभ भावनिक, कृतज्ञतापूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!