डॉ. केतकर यांची ज्ञाननिष्ठा प्रेरणादायी : माधुरी सहस्रबुद्धे
प्रथम मराठी साहित्य संमेलनात ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कार्याचा जागर
सातारा
“ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता; मात्र लक्ष्मीने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. ध्येयासाठी अखंड झटणाऱ्या या महामानवाने आयुष्यभर ज्ञानाची उपासना केली. त्यांची ज्ञाननिष्ठा प्रेरणादायी होती.मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा, यासाठी ते विशेष आग्रही होते. प्राणीमात्रांविषयी त्यांना विलक्षण प्रेम होते. त्यांची वृत्ती सदैव विधायक आणि समाजहिताची होती,” असे प्रतिपादन पुण्याच्या अभ्यासक वक्त्या माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व केतकर कुल महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम मराठी साहित्य संमेलन २०२६ अंतर्गत आयोजित विशेष परिसंवादात त्या बोलत होत्या. लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माधुरी सहस्रबुद्धे पुढे म्हणाल्या, “गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही डॉ. केतकर यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत आहोत. ध्येयाप्रती निष्ठा असलेली माणसे कोणत्याही परिस्थितीत आपल्या उद्दिष्टापासून दूर जात नाहीत. डॉ. केतकर हे ज्ञानाचा अथांग सागर होते. ज्ञानप्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातून समर्पण, त्याग आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा मिळते.”
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी ज्ञानकोश निर्मितीमागील डॉ. केतकर यांचे कष्ट अधोरेखित केले. ते म्हणाले, “ज्ञानकोश तयार करण्यासाठी डॉ. केतकर यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून स्वतंत्र लिमिटेड कंपनी स्थापन केली. एवढे भव्य कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाविषयी आजही गुगल आणि विकिपीडियावर अत्यल्प माहिती उपलब्ध आहे, ही खंत वाटते. अज्ञानाची जाणीव झाल्यानंतरच ज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. डॉ. केतकर यांचे जीवन हे ज्ञानसाधनेचे आदर्श उदाहरण आहे.”
इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे (चिपळूण) यांनी कोकणातील वैचारिक परंपरेचा गौरव करताना सांगितले, “रत्नागिरी जिल्ह्याने देशाला सहा भारतरत्ने दिली आहेत. गोपाळ गणेश आगरकर आणि डॉ. श्रीधर केतकर यांसारख्या विचारवंतांचे आदर्श आपण समोर ठेवले पाहिजेत. इतिहासात अजरामर व्हायचे असेल तर ज्ञान, विचार आणि समाजकारण यांचा संगम आवश्यक असतो.”
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विचार यांचाही अभ्यास करावा, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “अभ्यासाबरोबरच इतर जीवनमूल्ये आणि सामाजिक जाणीवा विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा वाटा असतो. दरवर्षी हे साहित्य संमेलन आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचारांचा वारसा देण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे श्रीराम नानल, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, मुख्याध्यापक विजय यादव, दत्तात्रय सावंत (पाटील), नितीनकुमार कसबे, शशिकांत जाधव, सतीश पवार, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, विपुल लोहार, रमेश महामुलकर, दत्तात्रय शिर्के, जगदीश खंडागळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, ज्ञानप्रेम आणि वैचारिक जडणघडण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

