ज्ञानकोशाची निर्मिती हा ज्ञानाचा अमूल्य ठेवा – प्राचार्य श्याम भुर्के


लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व केतकर कुल महासभेतर्फे प्रथम मराठी साहित्य संमेलन उत्साहात

सातारा
“नव्या जगाचे द्रष्टे विचारवंत म्हणून ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि ज्ञानप्रसाराची तळमळ त्यांच्या कार्यामागे होती. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मराठी ज्ञानकोशाची निर्मिती करून समाजाला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रभावी वक्ते तथा प्रथम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम भुर्के यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व केतकर कुल महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. गुरुवारी (दि. १८ जून) लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्याम भुर्के होते. ज्येष्ठ समीक्षक व वक्ते प्रा. देवानंद सोनटक्के यांनी उद्घाटक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून केतकर कुल महासभेचे अध्यक्ष प्रकाश केतकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, लेखक व चित्रपट अभ्यासक स्वप्निल पोरे, अजय केतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी शिरीष चिटणीस होते. प्रारंभी माधवी केतकर (पुणे) यांनी ईशस्तवन सादर केले.
प्राचार्य भुर्के पुढे म्हणाले, “डॉ. केतकर यांच्या मनात स्वातंत्र्याचा विचार खोलवर रुजला होता. त्यामुळे अमेरिकेतील संधी सोडून ते पुण्यात आले. त्यांच्या जवळ आर्थिक साधने नसतानाही त्यांनी ज्ञानकोशाची निर्मिती केली. देशभक्ती ही त्या त्या काळात कृतीतून व्यक्त करावी लागते, हे त्यांच्या जीवनातून शिकण्यास मिळते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणेच लोकांपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी त्यांनी ज्ञानकोशाचे खंड घराघरांत जाऊन विकले. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी एक पाऊल मागे घेण्याची तयारी आवश्यक असते, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.”
उद्घाटक प्रा. देवानंद सोनटक्के म्हणाले, “सजीव-निर्जीव सृष्टीपासून ते सूर्यप्रकाशात आढळणाऱ्या विविध घटकांपर्यंतची माहिती ज्ञानकोशात उपलब्ध आहे. डॉ. श्रीधर केतकर यांनी एकहाती ज्ञानकोश निर्मितीचे महान कार्य केले. तब्बल २३ खंड आणि दहा हजार पानांचा हा ज्ञानकोश त्यांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय तयार केला. समाजाला ज्ञानी करण्याची त्यांची तळमळ विलक्षण होती. नाटक, काव्य, इतिहास, समीक्षा, पत्रकारिता, संपादन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले लेखन त्यांच्या अफाट ज्ञानाची साक्ष देते.”
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी म्हणाले, “शाळांमध्ये अशा प्रकारची साहित्य संमेलने आयोजित होणे ही काळाची गरज आहे. शिरीष चिटणीस यांनी विद्यालयात आयोजित केलेले हे एकदिवसीय साहित्य संमेलन अत्यंत कौतुकास्पद व महत्त्वपूर्ण आहे. डॉ. केतकर यांच्या नावाने आयोजित हे संमेलन मराठी भाषा आणि ज्ञानकोश परंपरेला नवी दिशा देणारे ठरेल.”
लेखक व चित्रपट अभ्यासक स्वप्निल पोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कृतज्ञतेचा भाव समाजात कायम राहिला पाहिजे. केतकरांना ओलांडून पुढे जाणे शक्य नाही. समाजाची ज्ञानभूक भागविणाऱ्या या महामानवाला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. देशाचा मान कमी होईल असे भाषांतर करण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यासाठी मिळणारी मोठी आर्थिक रक्कमही नाकारली. शिरीष चिटणीस यांनी केतकरांच्या कार्याची उजळणी करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.”
स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस म्हणाले, “महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यवाह म्हणून काम करत असतानाच दरवर्षी डॉ. केतकर यांच्या स्मरणार्थ साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस मी बाळगला होता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरित्राचे वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, अशी अपेक्षा आहे. विविध विषयांच्या माध्यमातून पुढील काळातही डॉ. केतकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करूया. मराठी भाषेच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.”
केतकर कुल महासभेचे अध्यक्ष प्रकाश केतकर म्हणाले, “या साहित्य संमेलनामुळे डॉ. केतकर यांच्या विचारांची नव्या पिढीला ओळख होईल. त्यांचा वैचारिक वारसा जतन करणे ही केतकर कुल महासभेची जबाबदारी आहे.”

Advertisement

यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या चैताली पवार, सानिका शिंदे व श्रुतिका सावंत या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन अजय केतकर (मुंबई) यांनी केले, तर आभार शशिकांत जाधव यांनी मानले.
कार्यक्रमास मुकुंद फडके,माधुरी सहस्त्रबुद्धे,प्रकाश देशपांडे, प्राचार्य वि ना लांडगे, श्रीराम नानल, सु वा जोशी,अनुजा कुलकर्णी,गीता भुर्के,स्वप्नील जोशी,सुजाता हटकर,केतकर कुलसभेचे पदाधिकारी,लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, मुख्याध्यापक विजय यादव, दत्तात्रय सावंत (पाटील), नितीनकुमार कसबे, सतीश पवार, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, विपुल लोहार, रमेश महामुलकर, दत्तात्रय शिर्के, जगदीश खंडागळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!