लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रवास वर्णनात उमटते


अमेरिकेच्या अंतरंगात पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांचे मत

सातारा
अनेक लेखकांनी विविध प्रकारची प्रवासवर्णने लिहिली आहेत. एकाच देशाचा किंवा प्रदेशाचा प्रवास करून आलेल्या लेखकांची प्रवासवर्णने सुद्धा विविध प्रकारची आणि वेगळी असतात. कारण लेखकाने अनुभवलेले जग आणि त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या प्रवास वर्णनात उमटते, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या श्रीराम नानल यांनी लिहिलेल्या अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दीपलक्ष्मी सभागृहात पार पडला. तेव्हा उपस्थित मान्यवरांनी हे मत व्यक्त केले.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे होते. यावेळी व्यासपीठावर चपराक प्रकाशनचे संचालक घनश्याम पाटील,व्यवस्थापक प्रमोद येवले, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे डॉक्टर संदीप श्रोत्री, दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, उज्वला नानल, उपस्थित होते.
प्रारंभी लेखक श्रीराम नानल यांनी या प्रवास वर्णनात्मक पुस्तकामागील कल्पना आणि भूमिका स्पष्ट केली. परदेश प्रवास त्यातही अमेरिकेचा प्रवास ही माझ्या बकेट लिस्टमधील एक महत्त्वाची गोष्ट होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली.या प्रवासाचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले

घनश्याम पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये अतिशय चांगले पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पुस्तक वाचकांनी विकत घेऊन वाचावे आणि प्रतिक्रिया द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.प्रवास वर्णन हा एक वैयक्तिक अनुभव असल्यामुळे प्रत्येक लेखकाचे लेखन वेगळे असते यावर त्यांनी जोर दिला.

विनोद कुलकर्णी म्हणाले, श्रीराम नानल हे सामाजिक भान ठेवणारे आणि कोणत्याही विषयाकडे पोटतिडीकेने पाहणारे लेखक आहेत. त्यांनी अनेक चांगली माणसे सातारशी जोडली आहेत.या प्रवास वर्णनाच्या निमित्ताने त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. नानल यांच्या नजरेने टिपलेले अमेरिकेचे अंतरंग वाचकांना निश्चितच आवडेल.

Advertisement

मुकुंद फडके म्हणाले, लेखकाचे व्यक्तिमत्व नेहमीच लेखनामध्ये उमटते. श्रीराम नानल यांचे सौम्य आणि चिकित्सक व्यक्तिमत्व त्यांच्या लेखनामध्येही आपल्याला पाहायला मिळते. अमेरिकेचे दर्शन घडवताना त्यांनी तेथील सामाजिक समस्याही व्यक्त केल्या आहेत.अमेरिकेसारख्या महासत्तेचा एक चिकित्सक अनुभव श्रीराम नानल यांच्या या लेखनाच्या निमित्ताने वाचकांना वाचायला मिळणार आहे.अनवट अमेरिकेचे दर्शन त्यांनी यानिमित्ताने घडवले आहे.

डॉ संदीप श्रोत्री म्हणाले, प्रत्येकाचा चष्मा आणि नजर वेगळी असते आणि शैली ही वेगळी असते. त्याचेच प्रतिबंब प्रवास वर्णनाच्या लेखनामध्ये उमटते .श्रीराम नानल यांच्या या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांची शैली उमटली आहे.हे प्रवास वर्णन अतिशय विचार करून लिहिले आहे. साधारणपणे प्रवास हा शरीराचा असला तरी तो खऱ्या अर्थाने विचारांचा प्रवास असतो हे या पुस्तकातून समोर येते.
शिरीष चिटणीस म्हणाले, श्रीराम नानल सामाजिक क्षेत्रात कार्यरतआहेत. पण ते जरा उशिरा लेखक झाले. त्यांनी अनेकांना लेखनाला प्रोत्साहित केले. बँक अधिकारी असूनही त्यांची लेखन शैली अत्यंत सुंदर आहे .अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकामध्ये त्यांच्या या शैलीचे दर्शन घडते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीकांत कात्रे यांनी या पुस्तकाचे संस्करण करतानाची आपली भूमिका स्पष्ट केली. श्रीराम नानल यांनी या प्रवास वर्णनामध्ये जबाबदार पर्यटनाला महत्त्व दिले आहे. अमेरिका आणि भारताची तुलना ज्या ठिकाणी करावी लागली त्या ठिकाणी त्यांनी ती केली आहे. कोठेही नकारात्मक बाजू मांडली नाही. नानल यांच्याकडून भविष्यातही अशाच प्रकारचे लेखन अपेक्षित आहे
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी आभार मानले
या प्रकाशन सोहळ्याला साताऱ्यातील विविध मान्यवर, आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे सदस्य तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

फोटो ओळ
चपराक प्रकाशनाचे श्रीराम नानल लिखित अमेरिकेच्या अंतरंगात या पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री विनोद कुलकर्णी, श्रीकांत कात्रे व श्रीराम नानल
डावीकडून प्रमोद येवले, घनश्याम पाटील, मुकुंद फडके, उज्वला नानल, डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनायक भोसले व सविता कारंजकर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!