डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीविषयक धोरण म्हणजे सामाजिक क्रांतीच
विजय मांडके: ज्येष्ठ नागरिक संघ सातारा यांची डॉ. आंबेडकरांना आदरांजली
सातारा
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचे उद्गाते होतेच त्याचबरोबर त्यांचे स्त्री विषयक धोरण हे केवळ कायदेशीर बदल नव्हते तर ती सामाजिक क्रांती होती. भारतीय स्त्रीला डॉ आंबेडकरांनी ” दासी ” कडून ” नागरिक ” बनवले असे प्रतिपादन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक संघाचे माजी कार्यवाह विजय मांडके यांनी डॉ आंबेडकर हे एका अर्थाने भारताच्या जल व विद्युत निर्मिती धोरणाचे प्रणेते ठरतात असे सांगितले.
सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 व्या जयंतीचे औचित्य साधून विजय मांडके यांचे ” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज घडणीतील योगदान ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विजय मांडके बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती विद्या आगाशे होत्या. यावेळी मंचावर कार्याध्यक्ष मदनलाल देवी व कार्यवाह ज्योती मोहिते उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या शोषणाविरुद्ध व अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवलाच परंतु त्यांनी भारतातील ज्या व्यवस्थेने स्त्रीला उपेक्षित ठेवल आहे अशा स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा देण्याच काम संविधानिक पद्धतीने केले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना हिंदू कोड बिल हा विषय सोडून बोलताच येणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जल तसेच विद्युत निर्मिती आणि शेती या विषयावर सुद्धा केंद्रीय मंत्री असताना भरीव असे काम केले आहे. जलवाहतुक हा विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असावा असे त्यांचे मत होते. नदीजोड प्रकल्पाचे ते उद्गाते ठरतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पत्रकारितेचाही गौरवाने उल्लेख करून विजय मांडके यांनी बाबासाहेबांची पत्रकारिता समाज प्रबोधनाची होती. व्यावसायिक नव्हती असे स्पष्ट सांगितले.
कार्यवाह ज्योती मोहिते यांनी प्रास्ताविक केले
मदनलाल देवी यांनी आभार मानले.

