मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका
कार्यालयीन कारभार हस्तांतरित करण्यास स्थगिती मिळण्याची मागणी
पुणे:
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतमोजणी करताना अनेक गैरप्रकार झाले.मसापच्या आजीव सभासदांच्या भावनेचा आदर राखून निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत मुंबईच्या उच्च न्यायालयात रिट अर्ज ( स्टॅम्प क्रमांक ८५६१/२०२६ ) दाखल केलेला असून त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी व निकाल आव्हानीत केलेला आहे तसेच त्यामध्ये तथाकथित निवडून आलेल्या कार्यकारणीस रिट अर्ज प्रलंबित काळात कार्यालयीन कारभार हस्तांतरित करणेबाबत स्थगिती मिळावी अशी मागणी केलेली आहे.
मतपेटी सील करताना झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी अथवा टक्केवारी जाहीर करणे अपेक्षित होते. ती दिली गेली नाही. पत्रिका किती छापल्या, किती पाठवल्या, किती परत आल्या, मृत किती, दुबार किती याचा कसलाही हिशेब दिला गेला नाही. मतमोजणी करताना उमेदवारांनी आग्रह करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिका न दाखवता केवळ वाचून दाखवल्या. आमच्यावर विश्वास नाही का? असे सांगून नीतीमूल्ये पायदळी तुडवली. प्रा. मिलिंद जोशी आणि योगेश सोमण यांच्यात केवळ ४५ मतांचे अंतर आहे. तत्काळ फेरमतमोजणीची लेखी मागणी करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी ती नाकारली. एवढेच नव्हे तर मतमोजणीसाठी त्यांनी जी माणसे आणली होती, ती मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समवेत घोषणा देत होती आणि नाचत होती. मतमोजणी करणारी ही माणसे निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून आणली होती. हे सांगण्याची गरज नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचे हे वर्तन संशयास्पद आहे असे परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या वतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या आघाडीच्या वतीने बोलताना सुनीताराजे पवार म्हणाल्या, आजही साहित्य परिषदेत परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे बहुमत असून ३१ पैकी २४ जागा आघाडीने जिंकलेल्या आहेत. परिवर्तन उत्कर्ष आघाडीला पाठिंबा देणाऱ्या शाखांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे ६२०० मत पत्रिका जमा केल्या होत्या. याची नोंद आमच्याकडे आहे. प्रत्यक्षात पाच हजार तीनशे मते मिळाली. ही ९०० मते कुठे गेली? याचे उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांकडे नाही. अनेकदा विचारणा करूनही त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. हा सारा प्रकार गंभीर आहे. या आघाडीच्या उमेदवार मृणालिनी कानिटकर जोशी यांच्या मतातही निकालानंतर अशीच तफावत आढळली. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.
त्यापुढे म्हणाल्या, मतदारांनी भरभरून मते दिली मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभव केला. ही साहित्य परिषदेच्या आजीव सभासदांची शुद्ध फसवणूक आहे असे निदर्शनास आल्यानंतर मसापच्या आजीव सभासदांच्या भावनेचा आदर राखून निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत मुंबईच्या उच्च न्यायालयात रिट अर्ज ( स्टॅम्प क्रमांक ८५६१/२०२६ ) दाखल केलेला असून त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी व निकाल आव्हानीत केलेला आहे तसेच त्यामध्ये तथाकथित निवडून आलेल्या कार्यकारणीस रिट अर्ज प्रलंबित काळात कार्यालयीन कारभार हस्तांतरित करणेबाबत स्थगिती मिळावी अशी मागणी केलेली आहे. सदर रिट अर्ज ताबडतोब सुनावणीस घेण्यात यावा म्हणून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिखित विनंती केली असून त्याबाबत सुनावणीची तारीख निश्चित होणार असून अशी सुनावणी लवकरच अपेक्षित आहे असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

