जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध इंडिया आघाडी आक्रमक
साताऱ्यात बुधवारी निदर्शने
सातारा
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाविरुद्ध सातारा जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष ,समविचारी संघटना एकवटल्या असून या विधेयकाच्या निषेधार्थ येत्या बुधवारी ( दि.10) निदर्शने करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्हा काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात इंडिया आघाडी आणि समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 घटना विरोधी, लोकशाहीला बाधक आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होणार आहे. हा धोका वेळीच ओळखून या विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी सकाळी अकराला सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवनाच्या प्रांगणात जमतील आणि तिथून पोवई नाक्यावर येऊन जनसुरक्षा विधेयकाची होळी करून निषेध व्यक्त करतील. इंडिया आघाडीच्या प्रतिनिधीचे शिष्टमंडळही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यावेळी निवेदन सादर करणार आहे.
दरम्यान, या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, कॉ. माणिक अवघडे, कॉ.विजय निकम, ॲड .समीर देसाई , असलम तडसरकर, डॉ. नितीन सावंत, आनंदा सपकाळ विलास शेळके, उमेशराव देशमुख आदींनी विविध सूचना करीत हे आंदोलन प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पाच सप्टेंबर हा डॉ. भारत पाटणकर यांचा वाढदिवस असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ – शाल देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. काँग्रेसच्यावतीने शुभेच्छा देताना बाबुराव शिंदे यांनी सांगितले, की शेतमजूर ,कष्टकरी, धरणग्रस्तांच्या अन्यायाविरुद्ध व्यवस्थेला जाब विचारण्याचे आणि त्यांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी डॉ. पाटणकर गेली पाच दशके अखंडपणे आंदोलन करीत आले आहेत. या न्यायाने डॉ. पाटणकर हेच मोठे आंदोलन आहेत. जनसुरक्षा विधेयक लागू झाल्यास व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आवाज आता बंद होणार आहे. त्यामुळे या विधेयकाविरुद्धचा लढा डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली होण्यात मोठे औचित्य असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले

