सर्वांच्या सहकार्यामुळे संमेलनाचे शिवधनुष्य पेलले


विनोद कुलकर्णी: संमेलनाच्या फलश्रुतीवर साताऱ्यात परिसंवाद

सातारा
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास आले. पण संमेलनाचे हे शिवधनुष्य केवळ सातारकर रसिकांच्या
सहकार्यामुळेच आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष परिश्रमामुळेच यशस्वीरित्या पेलता आले असे प्रतिपादन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था,आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि संस्कार भारती सातारा यांच्यातर्फे साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावर परिसंवाद आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विनोद कुलकर्णी बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे प्रचार प्रमुख रुपेश कुंभार आणि अध्यक्ष म्हणून दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस उपस्थित होते. याशिवाय व्यासपीठावर पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री संस्कार भारतीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, उपाध्यक्ष डॉक्टर संजीव दीक्षित उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. नंतर डॉ संदीप श्रोत्री ह्यांचे हस्ते प्रमुख पाहुणे रुपेश कुंभार ह्यांचा सत्कार झाला तर संस्कारभारती अध्यक्ष दिलीप चरेगावकर ह्यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष चिटणीस ह्यांचा सत्कार झाला
सातारा साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि अटकेपार या स्मरणिकेचे व्यवस्थापकीय संपादक आणि संस्कार भारतीचे प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांचा सत्कार रुपेश कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना विनोद कुलकर्णी यांनी संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या स्थापनेपासून सातारा येथे संमेलन घेण्याचे स्वप्न बाळगले होते आणि ते अखेर पूर्ण केल्याचा आनंद आहे. पण हे संमेलन म्हणजे एक शिवधनुष्य होते याची जाणीव आम्हाला होती .
शाहूपुरी शाखेचे कार्यकर्ते आणि मावळा फौंडेशनचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने समस्त सातारकरांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शिवधनुष्य पेलता आले असे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
विनोद कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये संमेलनाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला आणि सातारा संमेलन हे एक दिशादर्शक संमेलन झाल्याचे सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सहकार्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वात महत्त्वाचे होते असेही त्यांनी सांगितले
मुकुंद फडके यांनी आपल्या भाषणामध्ये अटकेपार स्मरणिकेची जडणघडण कशी झाली याची माहिती दिली. ही स्मरणिका पुस्तक स्वरूपात लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली . विनोद कुलकर्णी यांनी या संमेलनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या समित्या स्थापन करत असताना योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नियुक्ती केल्यामुळेच हे संमेलन यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये संमेलनाची फलश्रुती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. हिंदवी रेडिओचे संचालक शेखर कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये संमेलनामध्ये आपल्याला काय दिले याची मुद्देसूद मांडणी केली सातारची साहित्यिक संस्कृती संवर्धित करण्याचे काम या साहित्य संमेलनाने केले असे त्यांनी सांगितले
उमा आठल्ये यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषण मध्ये संमेलनातील अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला. हे संमेलन सातारकरांसाठी एक सुवर्णसंधी होती आणि अनेकांनी त्या संधीचा लाभ घेतला त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य संमेलनामध्ये कवी कट्टा या महत्त्वाच्या विषयाची जबाबदारी असलेल्या सविता कारंजकर यांनी आपल्या भाषणामध्ये ही जबाबदारी आपण कशाप्रकारे पार पडली असे विवेचन केले विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळेच ही जबादारी यशस्वीपणे पार पाडता आली असे त्यांनी सांगितले या जबाबदारीच्या निमित्ताने मला अनेक गोष्टी शिकता आल्या कवितांमध्ये किती विविध प्रकारचे विषय हातात येतात हे समजले तसेच नकार कसा द्यायचा याचे शिक्षणही या निमित्ताने मला मिळाले असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ लेखक पद्माकर पाठकजी यांनी आपल्या भाषणामध्ये या संमेलनाच्या निमित्ताने अनेक स्थानिक सातारकरांना चांगली संधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली. संमेलनाचे नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे झाले. स्वच्छता हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते असे त्यांनी स्पष्ट केले. संमेलनातील पुस्तकांच्या विक्रीच्या स्टॉलची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट होती. स्टॉलधारकांना धुळीचा किंवा अन्य कोणताही त्रास न होता रसिकांपर्यंत आपली पुस्तके पोहोचवता आली असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणामध्ये संमेलन यशस्वी होण्यामागील विविध कारणांचा उहापोह केला आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्यामुळेच आणि कोणत्याही मानपानाची अपेक्षा न बाळगता काम केल्यानेच हे संमेलन अत्यंत यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारतीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले.त्यांनी संस्कार भारतीची माहिती देऊन हा कार्यक्रम घेण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली . रसिका केसकर, वर्षा साबडे, ऍड अमित द्रविड, संजीव आरेकर यांनी प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, सत्कार मूर्ती यांचा परिचय करून दिला. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी परिसंवादात सहभागी असलेल्या मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ संदीप श्रोत्री यांनी आम्ही पुस्तक प्रेमी समूहाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील देशपांडे यांनी केले. त्यांनीच आभार प्रदर्शन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!