आशा भोसले अष्टपैलू प्रतिभेच्या गायिका
दीपलक्ष्मी सभागृहात गाण्यांचा कार्यक्रम संपन्न
सातारा
आशा भोसले या अष्टपैलू प्रतिभेच्या गायिका आहेत सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आणि रसिकांचे मनोरंजन केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ९२ वर्षाच्या चिरतरुण पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फुलले रे क्षण माझे’ हा आशा भोसले यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .तेव्हा प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
मुकुंद फडके म्हणाले,सर्वच मंगेशकर भावंडे प्रतिभावंत होती पण आशा भोसले यांची प्रतिभा अष्टपैलू आहे. उडत्या चालीची गाणी,गझल,कव्वाली,पार्टी सॉंग हे सर्व प्रकार त्यांनी लीलया हाताळले.
दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस हे होते.त्यांनी आशा भोसले यांच्यावर होणाऱ्या या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि मंगेशकर कुटुंबाच्या संघर्षाची माहिती दिली.संघर्ष करून आपले कुटुंब सुस्थितीत कसे आणावे हे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या कष्टातून दिसून येते हे त्यांनी विशद केले.
आशा भोसले रजनी कार्यक्रम कै अभयसिंहराजे भोसले(भाऊसाहेब महाराज) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आम्ही साताऱ्यात १९९४ साली घेतला होता. या कार्यक्रमा निमित्त आशा भोसले यांच्या घरी मुंबईला जाण्याचा योग आला होता.त्यांच्या आदरातिथ्याने व नम्र वागण्याने आम्ही भाराऊन गेलो होतो अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सुरवातीला दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.दीपलक्ष्मी पतसंस्थेमार्फत गायक कलाकार यांचे स्वागत भेटवस्तू देऊन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमाची संकल्पना अश्विनी कांबळे आणि मेघा पंडित यांची होती. कार्यक्रमासाठी सुश्राव्य ध्वनि व्यवस्था माणिक कांबळे यांची होती.मेघा पंडित यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी निवेदना द्वारे आशा भोसले यांच्या आयुष्यातील काही महत्वाच गोष्टी आणि त्यांचा संघर्ष सादर केला . या कार्यक्रमात एकूण२७ गाणी सादर झाली त्यापैकी मेघा पंडीत यांनी १३ सोलो आणि अश्विनी कांबळे यांनी ११ सोलो आणि दोघींनी प्रत्येकी १ युगल गीत सादर केले.या युगल गीतासाठी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांची साथ लाभली .रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

