डॉ श्रोत्री यांच्याकडे माणसे जोडण्याची कला


सत्कार समारंभात डॉ सदानंद बोरसे यांचे कौतुकोद्गार
सातारा
येथील बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ संदीप श्रोत्री यांना सर्व क्षेत्रातील माणसे जोडण्याची कला आहे.त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील माणसे त्यांचे कौतुक करण्यास आली आहेत. डॉ संदीप श्रोत्री सारा व्याप सांभाळून एवढे लिखाण कसे करत असतील याचे आश्चर्य वाटते असे कौतुकोद्गार ज्येष्ठ शल्यचिकित्सक आणि राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ सदानंद बोरसे यांनी काढले
गेली तीन दशके वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक, निसर्ग आणि पर्यावरण, गिर्यारोहण या विविध क्षेत्रात आपला ठसा उटवणारे डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध संस्थांच्या पुढाकाराने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
पारसनीस कॉलनी येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर सदानंद बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
डॉक्टर सदानंद बोरसे यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्यातील लेखक श्रोत्यांना उलगडून दाखवला. ते म्हणाले,संदीप श्रोत्री यांचे पहिले पुस्तक राजहंसकडे आल्यावरच मला त्यांच्या लेखन सामर्थ्याची आणि निरीक्षणाची ओळख पटली. त्यांच्या या कर्तृत्वामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर स्वाती श्रोत्री यांचा मोठा वाटा आहे त्यांचे हे कौतुक बघण्यास त्यांच्या मातोश्री हजर आहेत याबद्दल मनाला खूप आनंद होत आहे
डॉ सदानंद बोरसे यांनी यावेळी डॉ श्रोत्री यांच्या सर्व पुस्तकाच्या मथळ्यांची माळ गुंफत एक सुंदर कविता सादर केली श्रोत्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे उमेश झिरपे यांनी डॉ श्रोत्री यांच्या भटकंतीच्या गुणाचे कौतुक केले सर्व व्याप सांभाळून गिर्यारोहण किंवा गिरिभ्रमण करण्याचा त्यांचा गुण घेण्यासारखा आहे असे ते म्हणाले सातारच्या मातीतच काहीतरी वेगळा गुण असल्याने अशी माणसे घडत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,रानवाटाचे पुरुषोत्तम पाटील आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी मनोगत व्यक्त करून डॉ श्रोत्री यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी डॉ संदीप श्रोत्री यांचा डॉ सदानंद बोरसे यांच्या हस्ते मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उमेश झिरपे यांनी डॉ स्वाती श्रोत्री यांचा सत्कार केला जयंत देशपांडे यांनी मानपत्राचे वाचन केले मानपत्राचे लेखन डॉ निर्मोही फडके यांनी केले होते आणि त्यातील कविता शिल्पा चिटणीस यांनी केली होती
सत्काराला उत्तर देताना डॉ श्रोत्री म्हणाले,मी आज भारावून गेलो आहे.या सोहळ्याला उपस्थित राहिलेला प्रत्येकजण हीच माझी खरी संपत्ती आहे मी माझा व्यवसाय सांभाळत लेखन गिर्यारोहण समाजकारण अशा अनेक गोष्टी करू शकलो ते माझ्या कुटुंबियांच्या सहकार्यामुळे. मी एव्हरेस्ट मोहीम किंवा इतर काही मोहीम केल्या असल्या तरी समाजातील प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात एव्हरेस्टएवढे भव्य काम करतच असतो या सत्काराचे नियोजन केल्याबद्दल आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप आणि इतर संस्थांना मनापासून धन्यवाद देतो.
यावेळी सातारची छोटी आणि विक्रमवीर गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी हिचा विशेष सत्कार उमेश झिरपे यांच्या हस्ते करण्यात आला
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने साहित्यिक भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित खास गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि सादरीकरण प्रदीप देसाई यांची होती मुंबई येथील गायिका कश्मिरा राईलकर आणि सातारचे गायक डॉक्टर सुनील पटवर्धन यांनी यावेळी गाणी सादर केली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले
सूत्रसंचालन मुकुंद फडके यांनी केले
श्रीराम नानल यांनी आभार मानले
कार्यकमाला समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
फोटो ओळ
डॉ संदीप श्रोत्री याना मानपत्र प्रदान करताना डॉ सदानंद बोरसे,शेजारी डावीकडून पुरुषोत्तम पाटील,विनोद कुलकर्णी,उमेश झिरपे,डॉ स्वाती श्रोत्री,शिरीष चिटणीस,मुकुंद फडके


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!