अनोरा चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार
लॉस एंजेलिस
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सेक्स वर्करच्या कथेवर आधारित ‘अनोरा’ हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
चित्रपटातील अभिनेत्री मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेता अॅड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.
अनोरा चित्रपटाला पाच श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील समाविष्ट आहे.शॉन बेकरला ‘अनोरा’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे, तसेच सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कारदेखील या चित्रपटाने पटकावला आहे.
‘द ब्रुटलिस्ट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मूळ संगीत आणि सर्वोत्कृष्ट छायांकनासाठीही ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात ‘द ब्रुटलिस्ट’ ला तीन, ‘विकेड’ ला दोन, ‘एमिलिया पेरेझ’ ला दोन आणि ‘ड्यून: पार्ट टू’ ला दोन पुरस्कार मिळाले आहेत.
ब्राझीलच्या ‘आय ॲम स्टिल हिअर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.हा चित्रपट ब्राझीलच्या राजकारणी रूबेन्स पाइवा यांच्या रहस्यमरित्या बेपत्ता होण्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पुरस्काराची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
या सोहळ्यात ‘ड्यून: पार्ट टू’ ला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि दुसरा सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी मिळाला आहे.’ड्यून: पार्ट टू’ हा चित्रपट फ्रँक हर्बर्ट यांची प्रसिद्ध कादंबरी ‘ड्यून’वर आधारित आहे. या चित्रपटाला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.’द ब्रुटालिस्ट’ मधील भूमिकेसाठी अॅड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.झोई सल्डानाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.अभिनेत्री झोई सल्डानाचा हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे. तिला ‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर झोई सल्डाना भावूक झाली होती.
तसेच, पॉल टाझवेल यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे. या श्रेणीत एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तर लॅटेव्हियन चित्रपट ‘फ्लो’ ला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. विशेष म्हणजे लॅटव्हियन चित्रपटाला ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे

