कालव्याजवळ धोकादायक वाहतूक
अपघात टाळण्यासाठी संरक्षक कठडे गरजेचे
सातारा
सातारा शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागामध्ये किंवा उपनगरामध्ये कालव्यांचे जाळे पसरले आहे या कालव्यांमधून सतत पाणी वाहत असते पण हे कालवे उघडे असल्याने त्याच्या दोन्ही बाजूने होणारी वाहतूक मात्र धोकादायक होत चालली आहे या कालव्यांना जर वेळीच संरक्षक कठडे बसवले नाहीत तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही
सातारा लोणंद मार्गावर कुपर कॉलनी परिसरात कॅप्टन सतीश शिंदे पोलीस चौकीच्या समोर जो कालवा आहे तो सतत पाण्याने वाहत असतो आणि या कालव्याच्या दोन्ही बाजूने कच्चा रस्ता असून त्यावरून सतत वाहतूक सुरू असते या कालव्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर लोक वस्ती झाली असल्याने वर्दळही जास्त आहे त्यामुळे छोट्या स्कूल बस किंवा विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा या व्यतिरिक्त छोट्या मोठ्या गाड्यांची वाहतूक या कालव्याच्या बाजूने चालू असते हा रस्ता छोटा आहे आणि दुहेरी वाहतूक सुरू असताना दोन वाहने जाणे अवघड होऊन बसते अशावेळी कालव्याच्या बाजूला असलेले एखादे वाहन घसरून कालव्यात डण्याच्या धोका लक्षात घ्यायला हवा

या परिसरामध्ये अनेक अपार्टमेंट झाल्या आहेत आणि लोकवस्तीही वाढली आहे त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोका कमी करण्याच्या उद्देशाने कालव्याच्या बाजूने संरक्षक कठडे बसवणे गरजेचे आहे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत विशेषतः रात्री अपरात्री या भागांमध्ये रस्त्यावरील दिव्यांचेही प्रमाण कमी असल्याने प्रकाशाचे प्रमाणही कमी असते आणि रात्रीची वाहतूक जास्त धोकादायक होत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे
सातारा शहरात इतरत्रही असे कालवे आहेत ज्याच्या बाजूने वाहतूक सुरु असते अशा कालव्याच्या बाजूने होणारी ही वाहतूक सुरक्षित करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेऊन या विषयांमध्ये लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

