वाचनाचे पर्यावरण निर्माण व्हायला हवे
ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली अपेक्षा
सातारा
ग्रंथ व्यासंग हा सातवा ऋतू आहे ज्यामुळे अंतर्मनांचे जग सुंदर होते यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे पुस्तकांचा आग्रह धरावा . कागदी फतव्यांनी वाचन संस्कृती वाढणार नाही तर वाचक वाढले पाहिजेत आणि त्यासाठी ग्रंथांविषयीचे प्रेम असणारी पिढी निर्माण व्हायला हवी,घरात आणि शाळेत वाचनाचे पर्यावरण निर्माण व्हायला हवे अशी अपेक्षा ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली
येथील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये 24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले .त्यावेळी यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून ते बोलत होते यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर , ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस , महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी दीपक गमरे , समन्वयक प्रल्हाद पारटे सुनीता कदम, डॉक्टर राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे,निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम व संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिता राजेपवार , इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली त्यानंतर मान्यवरांचा संयोजन समितीच्या हस्ते शाल कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात आला .
प्रवीण दवणे म्हणाले, तनामनात जागवी आज ग्रंथपालवी ही कविता आजच्या ग्रंथ महोत्सवाला चपखल लागू होते विद्यार्थ्यांनी वेगवेगळी पुस्तके वाचायला हवीत त्यासाठी साहित्य वेध घेणारी तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांची पिढी सक्रिय असायला हवी अशा शिक्षकांना शिक्षणव्यवस्थेने संवेदनशील पणे टिपायला हवे. स्वधर्म म्हणून शिक्षकी पेशाकडे बघणाऱ्या प्रवृत्ती आता फार कमी उरल्या आहेत केवळ कागदी कायदे सुसंस्कृत सत्संगी पिढी घडवू शकत नाही त्यासाठी ग्रंथ व्यासंगाचे वातावरण घराघरातून तयार व्हायला हवे
निकोप समाज रचनेसाठी प्रगल्भ नेतृत्व गुण आवश्यक असतात आणि ते ग्रंथ व्यासंगातून जन्माला येतात .पुस्तकी पांडित्याइतकेच जगण्याचे भान देणारे व्यवहार ज्ञान महत्त्वाचे आहे त्यासाठी उत्तम वाचणे आवश्यक आहे असे प्रतिपादन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले .
सलग 24 वर्ष ग्रंथ प्रदर्शन साताऱ्यात होत आहे याचा आनंद आहे .विद्यार्थ्यांना ग्रंथापर्यंत घेऊन जाणे आणि ग्रंथ वाचनाविषयी प्रेम निर्माण करणे ही प्रक्रिया महत्त्वाची असून त्यामधून सुसंस्कृत वाचक घडत असतो . पुस्तक वाचन ही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घरात एक छोटे ग्रंथालय तयार करावे असे आवाहन त्यांनी केले .
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तत्पूर्वी शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्याचे शैक्षणिक धोरण स्पष्ट केले ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे यांच्या अनुपस्थितीत घरात ग्रंथघर हवे आणि ज्ञानाचे लावण्य या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार शाल कंदी पेढे देऊन करण्यात आला राजीव खांडेकर यांच्या पत्नी जान्हवी खांडेकर व दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांचाही विषय सत्कार करण्यात आला . प्रास्तविक शिरिष चिटणीस यांनी तर सूत्रसंचालन सुनीता कदम यांनी केले . राजकुमार निकम यांनी आभार मानले .