गाडगेबाबा महान कर्मयोगी : श्रीमंत कोकाटे


ब्रह्मपुरी येथे 68 व्या स्मृतिदिनी विविध उपक्रम

सातारा
महाराष्ट्राच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी आणि सकल समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणारे गाडगेबाबा महान कर्मयोगी आणि चालते बोलते लोक विद्यापीठ होते ,असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
रहिमतपूर – ब्रह्मपुरी येथील आश्रम शाळेत गाडगे महाराज यांच्या 68 व्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गाडगे महाराज मिशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते – पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने ,नगराध्यक्ष आनंदा कोरे उपस्थित होते.
गौतम बुद्ध , भगवान महावीर, चक्रधर स्वामी यांच्या समाज प्रबोधन परंपरेचा आढावा घेऊन कोकाटे म्हणाले, की जात ही मानसिक – काल्पनिक आहे. सर्व मानव एकच आहेत ,हा केवळ विचार मांडून नव्हे तर त्याला कृतीची जोड देणाऱ्या गाडगेबाबांनी प्रबोधनाची ही चळवळ पुढे नेली. पाश्चिमात्य देशात प्रबोधनाचा असाच प्रयत्न सॉक्रेटिस या तत्त्ववेत्याने केला. तोच प्रयत्न करणारे गाडगेबाबा म्हणजे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस आहेत.., अशा शब्दात गौरव करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख आदींच्या सामाजिक – शिक्षण विषयक कार्याला त्यांनी मोठी साथ दिल्याचेही कोकाटे यांनी नमूद केले.
सुनील माने यांनी पुरोगामी समजल्या जात असणाऱ्या महाराष्ट्राची सध्याची प्रतिमा मलीन होत चालली असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षणाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले
अध्यक्षस्थानावरून मधुसूदन मोहिते -पाटील म्हणाले, की गाडगेबाबा आणि त्यांचे अनुयायी जिजाबा पाटील – सोहोलीकर यांना अभिप्रेत असणाऱ्या मार्गावरूनच गाडगे महाराज मिशनची वाटचाल चालू राहण्याबाबत आम्ही सदैव दक्ष राहू.
मुख्याध्यापक (माध्यमिक )भारती मोहिते यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक (प्राथमिक )रमेश घोलप यांनी आभार मानले.
महेशकुमार बोभाटे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास राजेंद्र शेलार, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. आसावरी शिंदे ,माजी नगराध्यक्ष अविनाश माने, दिलीप कदम, दीपक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

छायाचित्र ओळी :
ब्रह्मपुरी – रहिमतपूर येथील गाडगे महाराज आश्रम शाळेत 68 व्या स्मृतिदिनानिमित्त गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करताना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे ,सुनील माने ,आनंदा कोरे आदी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!