प्रा. दशरथ सगरे यांना शिक्षणमहर्षी डॉ. मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्कार
शिक्षण व समाजकार्यातील योगदानाचा यथोचित गौरव
सातारा
यशोदा इन्स्टिट्यूट साताऱ्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना शिक्षणमहर्षी डॉ. मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे प्रतिष्ठानकडून सदरच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलचे पत्र प्रतिष्ठानकडून पाठवण्यात आले.
अतिशय प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल यशोदा परिवाराकडून आनंद व्यक्त करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवास सातारा सारख्या ऐतिहासिक भूमीमध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणण्यापर्यंत अविरतपणे कार्य करणारे प्रा. दशरथ सगरे यांचा यथोचित गौरव करण्यात आला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य साकारता येते याची प्रचिती प्रा.दशरथ सगरे यांनी कृतीतून सिद्ध करून दाखविली आहे. प्रतिकूलतेतून यशाची भरारी घेणाऱ्या दशरथ सगरे यांनी सातारच्या ऐतिहासिक भूमीत ज्ञान संस्कृतीचे नवे विश्व उभे करून ग्रामीण व दुर्गम भागातील असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गुढी उभी केली आहे ज्ञानसाधना व ज्ञान संस्कृतीचा अखंड वसा घेऊन वाटचाल करणारे प्रा. दशरथ सगरे याचा जीवन प्रवास थक्क करणार आहे. बार्शी जि. सोलापूर सारख्या दुष्काळग्रस्त भागात जन्मलेले दशरथ सगरे यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते वडिलांच्या कृपाछञाखाली वावरणारे दशरथ सगरे बालपणापासून वडिलांचे कष्ट जवळूण अनुभवत होते आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारे दशरथ सगरे यांनी बालवयात प्रतिकूलतेवर मात करण्याचा निर्धार केला परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर ज्ञानरूपी शिक्षणाची कास धरली पाहिजे हे मनाशी ठाम ठरवून शालेय शिक्षणात स्वतःला झोकून दिले शालेय शिक्षणात विशेष प्रविण्य मिळवत असताना त्यामध्ये लागलेली गोडी पुढे उच्च शिक्षणासाठी कारणीभूत ठरली.
सामाजिक जाणीव च्या भावनेतून शिक्षण संस्थांची उभारणी करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले, समाजातील अनेक आर्थिक दृष्ट्या माव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दत्तक पालक योजनेसारखी महत्त्वकांक्षी कल्पना त्यांनी सत्यात उतरवली, ज्यामध्ये जवळपास हजार विद्यार्थी कोणतेही शैक्षणिक शुल्क न भरता शिक्षण घेतात.
कोरोना सारख्या भयंकर महामारीमध्ये जगभर हाहाकार पसरला होता. सर्वसामान्यांच्या जगण्याची आशा धूसर होत असताना शिक्षण दुरापास्त होत असताना. प्रा. सगरे यांनी कोरोना मध्ये आई-वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सर्वात प्रथम घोषणा देखील यशोदा शिक्षण संस्थेची होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे असल्याचे देखील ते सांगतात.
शिक्षण क्षेत्रातील आधुनिक प्रवाह सर्वसामान्य तरुणांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी चा माझा प्रयत्न असून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांच्या विचाराने यशोदा शिक्षण संस्था आपली वाटचाल करत राहणार आहे. सातारा जिल्ह्यात आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा समर्थपणे देताना विचारांच्या बळावरच संस्था उभ्या राहतात व टिकतात याचे विस्मरण कधीही होणे शक्य नाही. मी ज्या कठीण परिस्थितीतून आलो आहे त्याची जाणीव ठेवून यशोधामध्ये शिकणाऱ्या हजारो मुला-मुलींना विचार आणि संस्कारांचा परिपाठ देणे व प्रगत शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली करून देणे यातच मला आनंद वाटतो असे म्हणणारे प्रा. दशरथ सगरे हे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्याच महाविद्यालयात कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेणाऱ्यांपैकी एक आहेत, त्याच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार सर्वाधिक समाधान देणारा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भारत हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणाईला अधिक सक्षम करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचा वाटा मोलाचा आहे. भारताचं उज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि राष्ट्राचा नावलौकिक सातासमुद्रापार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबींसाठी यशोदा शिक्षण संस्था अग्रेसर असेल, राष्ट्रनिर्माणची कोणतीही जबाबदारी पेलवण्यासाठी, युवकांना अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी, समाजाभिमुख बदलाच्या क्रांतीसाठी सर्वांनी पुढे येऊन अधिक मजबूत शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणा देत राहील असेही ते यावेळी म्हणाले.
सदरच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा. दशरथ सगरे यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

