सट्टाबाजाराचा कौल महायुतीलाच
फलोदी,बिकानेर आणि महादेव बेटिंगचा अंदाज
मुंबई
महाराष्ट्र विधानसभेत बहुमत कोणाला मिळणार आगामी २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असले तरी निकालापूर्वी सट्टाबाजार तापला आहे.
एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. या मालिकेत फलोदी बेटिंग मार्केटचे आकडे समोर आले आहेत. यानुसार भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून राज्यात एकट्या भाजपला ९० ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय शिवसेनेला (शिंदे गट) ३६ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज असून राष्ट्रवादी (अजित गट) १२ ते १६ जागा जिंकू शकते. त्याचवेळी, फलोदी सट्टा बाजारच्या आकडेवारीनुसार महायुती आघाडीला १४२ ते १५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाआघाडीतील मित्रपक्षांचे सरकार कायम राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
फलोदी सट्टा बाजार व्यतिरिक्त बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत. यानुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचा फार कमी फरक पडणार असल्याचेही या दोन्ही सट्टा बाजाराच्या आकडेवारीतून बोलले जात असून अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात.
महाराष्ट्रात महायुती (भाजप, शिंदे गट, अजित गट) आणि महाविकास आघाडी (उद्धव गट, शरद गट आणि काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असून महायुतीत भाजप १४९, शिवसेना ८१ तर अजित पवार यांची राष्ट्रवादीने ५९ जागांवर निवडणूक लढवली आहे. तसेच मध्ये काँग्रेसने १०१ जागांवर, शिवसेनेने ९५ जागा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ८६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

