भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा


मोदी- शाहांच्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा
ठाणे
महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र विधान सभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली होती. अखेर निकालाच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असं सांगितलं. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो निर्णय मान्य असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्या मोदी, शाह साहेबांबरोबर मी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत आम्ही सरकार संदर्भात निर्णय घेऊ,असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो हा विजय जनतेचा आहे, निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. रात्रभर काम करायचो, 2 3 तास झोपायचो आणि पुन्हा काम करायचो. मी मोजल्या नाहीत पण 70-80 सभा घेतल्या. मी आधी देखील कार्यकर्ता म्हणून काम केले पुढे देखील करेन. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे,असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे, आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे. कुठे घोडे अडले नाही, मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, ताणून ठेवणारा माणूस नाही. मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद मला नशिबाने मिळालं आहे. म्हणून मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना कोणतंही अडचण माझ्यामुळे येणार नाही, तुम्ही आम्हाला मदत केली, संधी दिली, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय जो आहे, तो भाजपसाठी अंतिम असेल तसंच तो आमच्यासाठीही अंतिम असेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!