शिक्षकांच्या शिस्तीतूनच आयुष्य घडले – अजय ढोबळे
लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर येथे बालकुमार साहित्य संमेलन
सातारा
“माझ्या जडणघडणीचे सर्व श्रेय शिक्षकांना आहे. आज मी समाजात मानाने वावरतो, यामागे शिक्षकांनी दिलेली शिस्त व संस्कार आहेत. आयुष्यभर मी त्यांचा ऋणी राहीन,” असे भावनिक उद्गार लोकमंगल हायस्कूलचे माजी विद्यार्थी व संमेलनाध्यक्ष कु. अजय ढोबळे (बी.टेक, सिव्हिल इंजिनिअर) यांनी काढले. बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि शिक्षणाचा पाया इथूनच मजबूत होतो. विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करताना शिक्षक व पालकांचा आदर कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा आणि लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, मोळाचा ओढा, गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने *२० वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन २०२५* मंगळवार, *दि. २३ डिसेंबर २०२५* रोजी सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेत लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन रोहित वायदंडे (बी.एस्सी.), लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा अध्यक्ष शिरीष चिटणीस, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा अध्यक्ष शिल्पा चिटणीस, माजी सैनिक रामचंद्र जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी शिंदे उपस्थित होते.
यावेळी रोहित वायदंडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उल्लेख करत, “मराठी साहित्य मुलांनी वाचले पाहिजे व आत्मसात केले पाहिजे. अशा साहित्य संमेलनांतूनच उद्याचे लेखक व कवी घडतील,” असे प्रतिपादन केले.
शिरीष चिटणीस म्हणाले, “या विद्यालयातून बाहेर पडलेले विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. माजी विद्यार्थ्यांचे अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.”
शिल्पा चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर मर्यादित व केवळ अभ्यासासाठी करण्याचे आवाहन करत, “जास्तीत जास्त वाचन करून हातात पुस्तक घेण्याची सवय लावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आमची संस्था सातत्याने करत आहे,” असे नमूद केले.
माजी सैनिक रामचंद्र जाधव यांनी, “लहान मुले मनापासून कला सादर करतात. आदर्श नागरिक घडवण्याचे महत्त्वाचे कार्य शाळा व शिक्षक करतात. पालकांनी आपल्या पाल्यांना अशा कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,” असे मत व्यक्त केले.
सकाळी आठ ते नऊ या वेळेत उद्घाटन, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, स्वागत गीत, प्रास्ताविक व मान्यवरांची मनोगते पार पडली. नऊ ते साडेअकरा या वेळेत विद्यार्थ्यांनी कथाकथन, काव्यगायन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी रमेश महामुलकर व दत्तात्रय सावंत यांनी तबला–पेटीच्या तालावर ‘आगतम स्वागतम’ हे स्वागत गीत सादर केले. माजी विद्यार्थी अजय ढोबळे व रोहित वायदंडे यांनी प्राथमिक विद्यार्थ्यांना क्रिकेट साहित्य भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या संमेलनासाठी शांताराम पवार, जितेंद्र टोणपे, बाळकृष्ण फडतरे, उज्वला कर्णवर, शेग्या गावित, हणमंत खुडे, बाळकृष्ण इंगळे, विपुल लोहार, दत्तात्रय शिर्के, संदीप भोसले, जगदीश खंडागळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सुर्वे यांनी केले तर आभार उज्वला कर्णवर यांनी मानले.

