महागाई भत्त्यात वाढ
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
नवी दिल्ली
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी आली आहे.बुधवारी पार पडलेल्या बैठकीत महागाई भत्ता आणि महागाई मदत (DR) मध्ये 3 टक्के वाढ करण्यास मोदी मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 53 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे या डीएमधील वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.
सरकारकडून केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई मदत (DR) दिली जाते. केंद्र सरकारने 2006 मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मोजण्याचे सूत्र सुधारित केले होते. त्यानंतर साधारणपणे महागाई भत्ता आणि महागाई मदत जानेवारी व जुलै अशी वर्षातून दोनदा मिळते. याआधी मार्च महिन्यात सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, सध्या एक कोटींहून अधिक केंद्रिय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मात्र जुलै महिन्यात डीए/डीआर वाढीची घोषणा कर्मचाऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती.
केंद्रीय कर्मचारी आणि कामगारांच्या महासंघाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन 30 सप्टेंबर रोजी डीए/डीआर वाढीची घोषणा करण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. यानंतर आता मोदी सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये 3 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी आहे. असे असले तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची डीएची थकबाकीही मिळणार आहे.
दरम्यान, केंद्रिय कर्मचाऱ्यांचा डीए हा त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर ठरविला जातो. म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30 हजार रुपये असेल आणि त्याचा डीए 3 टक्क्यांनी वाढला तर त्याच्या पगारात 900 रुपयांची वाढ होईल. जर मूळ वेतन, डीए आणि गृहनिर्माण भत्ता म्हणजेच एचआरए जोडण्यापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 55,000 रुपये असेल, तर आता त्याला 55,900 रुपये मिळतील.

