चेन्नई कसोटीत भारताचा विजय
अश्विनची बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!
चेन्नई
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. भारतानं बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य दिलं होतं.प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच 234 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताच्या विजयाचा हिरो आर. अश्विननं दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. या सामन्यात अश्विननं शतकही झळकावलं. तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर टीम इंडियानं 4 बाद 287 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला होता. भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली होती.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर फलंदाज शादमान इस्लाम आणि झाकीर हसन यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ही भागीदारी तोडली. त्यानं झाकीरला यशस्वी जयस्वालच्या हाती झेलबाद केलं. झाकीरनं 33 धावा केल्या. त्यानंतर ऑफस्पिनर आर. अश्विननं शादमान इस्लामला पायचीत करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. शादमाननं बाद होण्यापूर्वी 35 धावा केल्या.
यानंतर अश्विननं मोमिनुल हकच्या रुपात भारताला तिसरं यश मिळवून दिलं. मोमिनुल (13) बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा होती. यानंतर अश्विननं विकेटची झडी लावली. त्यानं मुशफिकुर रहीमला (13) केएल राहुलकडे झेलबाद केलं. अश्विननं रहिमला कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा बाद केलं आहे. रहीम बाद झाल्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
सामन्याच्या चौथ्या दिवशी नजमुल आणि शाकिब अल हसननं डाव पुढे नेला. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या तासात दोन्ही खेळाडूंनी संयमी फलंदाजी करत भारताला विकेट घेऊ दिली नाही. मात्र, दुसऱ्या तासात शाकिबला अश्विननं यशस्वी जयस्वालच्या हाती झेलबाद केल्यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन केले. शाकीब (25) आणि नजमुल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली.
भारतीय संघाला लवकरच सहावं यश मिळालं, जेव्हा लिटन दास (1) बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अश्विननं मेहदी हसन मिराजला बाद करून डावातील आपली पाचवी विकेट घेतली. जडेजाच्या गोलंदाजीत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नजमुल हुसैन बुमराहच्या हाती झेलबाद झाला. त्यानं 127 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. यानंतर अश्विनची जादू कायम राहिली आणि त्यानं तस्किन अहमदलाही (5) बाद केलं. हसन महमूदला बाद करून जडेजानं शेवटची विकेट घेतली.