नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव
नावाच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे
पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.
एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात वारीचे महत्त्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे. वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले.
सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे करुन प्रश्न मार्गी लावावी. देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्याकरीता केंद्र सरकारने सहकार्य करावे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले की, पालखी महामार्गांवरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत; दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री श्री. पाटील म्हणाले.
यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, श्रीमती सुळे व आमदार श्री. तापकीर यांनीही विचार व्यक्त केले. श्री. श्रीवास्तव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

