गटारी नव्हे,दीप अमावस्या
श्रावण महिन्याच्या स्वागताची प्रकाशमय तयारी
दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये आषाढी आमावस्येला दीप अमावस्या किंवा आधुनिक काळात गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दीप पूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे.गटारी अमावस्या या प्रथेने निर्माण केलेले चुकीचे प्रकार बाजूला करून श्रावण महिन्याच्या स्वागताची प्रकाशमय तयारी करण्याचा हा दिवस आहे
आषाढ- श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात. आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते.आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या महिन्याची सुरूवात होते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.
दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. या दिवशी घरातील पितळेचे, चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात. दिवे तीळ्याच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना फुलं, नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते. अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो.
दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे.
अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे.माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे. घरगुती वाद टाळ्यासाठी दीपदान केले जाते.आयुष्यातील अंध:कार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावे.धन-समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपादान केले जाते.
