हमासचे मुख्य नेते इस्माईल हानिये यांची हत्या


तेहरानमध्ये इस्त्रायलने हल्ला करून संपवले

तेहरान
हमास संघटनेचे मुख्य नेते इस्माईल हानिये मारले गेले आहेत.इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इस्माईल हानिये तेहरानमध्ये मारले गेले आहेत.हमासने दिलेल्या माहितीनुसार, ‘तेहरानमध्ये इस्माईल हानिये राहत असलेल्या घरावर इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यात हानिये मारले गेले.
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे आयआरजीसीने आज (31 जुलै) या घटनेची माहिती दिली. आयआरजीसीनुसार, इस्माईल हानियेंसोबत त्यांचे काही सुरक्षारक्षकही मारले गेले आहेत.याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.हमासच्या माहितीनुसार, इस्माईल हानिये इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेहरानमध्ये गेले होते.
इस्माईल हानिये यांच्या मृत्यूनंतर हमासच्या नेत्यांनी भाष्य केले असून हानियेंच्या हत्येचं प्रत्युत्तर हमासकडून दिलं जाईल, असं त्यांनी म्हटलंय. मौस्सा अबु मरझौक म्हणाले की, “हा भ्याड हल्ला ‘शिक्षेविना’ राहणार नाही.
एप्रिल 2024 मध्ये इस्रायलनं एका गाडीवर तीन मिसाईल्स डागल्या आणि या हल्ल्यात इस्माईल हानिये यांची तीन मुलं, तीन नातवंडं आणि ड्रायव्हर मारले गेले होते.या घटनेवर इस्रायलकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीय. मात्र, इस्रायलमधील हेरिटेज मंत्री अमिचय एलियाहू म्हणाले की, “जगातील कचरा काढण्याचा हाच योग्य मार्ग आहे. आता कुठलेच काल्पनिक शांतता, आत्मसमर्पणाचे करार होणार नाहीत.”

Advertisement

इस्माईल हानियेंच्या मृत्यूमुळे जग आणखी सुंदर बनल्याचंही एलियाहू म्हणाले.इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय.
इस्माईल हानिये कोण होते?

इस्माईल हानिये हे हमासचे मुख्य नेता मानले जातात.1980 च्या दशकाच्या शेवटी हमास ही संघटना उदयाला आली होती. इस्रायलने इस्माईल हानिये यांना 1989 मध्ये तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकलं होतं. पॅलेस्टाईनच्या चळवळीला चाप लावण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल होतं.1992 मध्ये ते इस्रायल आणि लेबननमधील भागात हमासच्या इतर नेत्यांबरोबर अज्ञातवासात गेले.एक वर्ष अज्ञातवासात घालवल्यानंतर ते गाझामध्ये परतले. 1997 मध्ये त्यांना हमासचा प्रमुख नेता म्हणून निवडण्यात आलं.2006 मध्ये त्यांना पॅलेस्टाईनचे पंतप्रधान म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बासय यांनी नियुक्त केलं. त्यावर्षीच्या निवडणुकांत हनिया यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, एकाच वर्षांत त्यांना पायउतार व्हावं लागलं. अब्बास यांच्या फतेह पक्षाला गाझा पट्टीत आठवडाभर झालेल्या हिंसाचारानंतर काढून टाकण्यात आलं. यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं.हानिये यांची बरखास्ती राज्यघटनेला धरून नसल्याचं म्हटलं आणि पॅलेस्टिनी लोकांची जबाबदारी ढकलणार नाही असं म्हणत गाझावर राज्य करत राहिले.2017 मध्ये हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2018 मध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटने त्यांना ‘दहशतवादी’ घोषित केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते कतारमध्ये राहत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!