आरक्षणाच्या आगीत पवारांचे तेल:प्रकाश आंबेडकर
आरक्षणाचा चेंडू ठाकरेंनी मोदींच्या कोर्टात टोलवणे दुर्दैवी
मुंबई
मराठा आरक्षणाच्या आगीत शरद पवार तेल ओतत आहेत, तर महाराष्ट्रात विचका करून मराठा आरक्षणाचा चेंडू उद्धव ठाकरेंनी मोदींच्या कोर्टात टोलवला, हा सगळा दुर्दैवी प्रकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या साथीने अडीच वर्षे सरकार चालवताना मराठा आरक्षणाचा पूर्ण विचका केला. आधीच्या फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकले होते. परंतु, ते सुप्रीम कोर्टात ठाकरे – पवार सरकारने टिकवले नाही. अडीच वर्षांपूर्वी पवारांच्या पाठिंब्याचे ठाकरेंचे सरकार गेले. शिंदे – फडणवीस सरकार आले त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन उभे राहिले. मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण देण्याचा हट्ट धरला. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा आरक्षण असा संघर्ष उभा राहिला. आरक्षण मुद्द्याचा पुरता विचका झाला. आता हा विचका सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तो चेंडू मोदींकडे टोलवला आहे.
पण ठाकरेंनी आरक्षणाचा चेंडू पंतप्रधान मोदींच्या कोर्टात सहज टोलवलेला नाही. त्याआधी भरपूर नाट्यमय घटना मातोश्री भोवती घडल्या. उद्धव ठाकरेंनी काल मराठा आरक्षण आंदोलकांना भेटच दिली नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मातोश्री समोर आज निदर्शने केली. मराठा आरक्षण आंदोलकांनी त्याआधी शरद पवारांची देखील भेट घेतली होती. शरद पवारांनी आंदोलकांना भेट दिली, पण ठाकरेंनी भेट दिली नाही त्यामुळे आरक्षणाचा विषय ठाकरेंच्या विरोधात पेटला. त्याची धग आपल्याला लागू नये म्हणून आज उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्यासमोर विशिष्ट भूमिका मांडली.
पण ही भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा विषय मात्र पंतप्रधान मोदींच्या कोर्टात ढकलला. त्यासाठी त्यांनी बिहारमधल्या आरक्षणाचा हवाला दिला. बिहार मधले आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले. त्यामुळे आता कुठल्याही आरक्षणाचा विषय राज्याचा राहिलाच नाही. तो केंद्राचा झाला आहे. लोकसभेमध्ये जर पंतप्रधान मोदींनी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचे विधेयक आणले, तर सगळे खासदार पाठिंबा देतील. त्यात आपल्या शिवसेनेचेही खासदार असतील, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना दिले.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आरक्षणाच्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी आहे. आरक्षण मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात? हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या ट्विटर वर नमूद केले.
