मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची मुदत
मुंबई
मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 13 ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, की मला हातपाय दाबून सलाईन लावली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसं केलं. माझं कुणीही ऐकलं नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही. सरकारची दमछाक कमी होईल. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, की सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही.समाजाने सलाईन न लावण्याची परवानगी दिली तरच आंदोलन पुढे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, की ‘सरकारतर्फे कुणीही आलं नाही. कारण आता सरकारकडे मंत्रीच उरले नाहीत. अनेकजण आधीच आले. अशात आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचं हा विषय असेल.’
यावेळी त्यांनी सरकारला वेळही वाढवून दिला आहे. सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं सांगत ते म्हणाले, की ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात.
