वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स भारताने जिंकली


अंतिम सामन्यात भारताच्या संघाने पाकिस्तानला धूळ चारली
लंडन
काही दिवसांपूर्वीच भारताच्या संघाने टी20 वर्ल्डकप जिंकत भारतीयांना मोठा विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली. या आनंदोत्सव अद्यापही काही क्रिकेटप्रेमी साजरा करत आहेत. अशातच आता आणखी एक कप भारतीय संघाला जिंकण्यात यश आले आहे. भारताच्या जुन्या खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारताच्या संघाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू युवराज सिंग याच्या नेतृत्वात ही चॅम्पियनशिप खेळण्यात आली होती. त्यामुळे महिन्याभराच्या आत भारताच्या दुसऱ्या एका संघाने वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले आहे.

Advertisement

शनिवारी (ता. 13 जुलै) बर्मिंघम येथे वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2024 चा अंतिम सामना खेळला गेला. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा सामना झाला. ज्यामध्ये युवराज सिंग याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत या चषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात नाणेफेक जिंकत पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकांत 156 धावा केल्या. तर भारतीय संघाने विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत पाच गडी राखून धावांचे हे लक्ष्य पूर्ण केले. भारताकडून अंबाती रायडूने जोरदार खेळी करत 50 धावा केल्या. अंबातीच्या या खेळीमुळेच भारताला हा विजय मिळवणे सोपे झाले.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2024 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन युनिस खानने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने 156 धावा करून भारतासमोर 157 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यामध्ये शोएब मलिकने 36 चेंडूंमध्ये 3 षटकारांच्या मदतीने संघासाठी 41 धावा केल्या. काही वेळासाठी असे वाटत होते की पाकिस्तानचा संघ सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभी करेल, पण भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
यानंतर भारताच्या संघाने फलंदाजी करत 19.1 षटकांत पाच विकेट गमावून 159 धावा केल्या आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2024 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. यावेळी अंबाती रायडूने केलेल्या मोठ्या खेळीमुळे भारताला पाकिस्तानच्या संघाला धूळ चारता आली. रायडूने 30 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार लगावत अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा किताब देण्यात आला. तर, भारताचा स्टार गोलंदाज राहिलेल्या इरफान पठाणने विजयी षटकार लगावला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!