अरुणाचल प्रदेशात पुन्हा ‘कमळ’
60 पैकी 46 जागा जिंकण्यात भाजपाला यश
इटानगर
अरुणाचल प्रदेशच्या 60 विधानसभा जागांसाठी 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.भाजपने 60 पैकी 46 जागांवर विजय मिळवला आहे.अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या 60 जागा असल्या तरी प्रत्यक्षात 50 जागांवरच भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली कारण 10 जागा बिनविरोध लढल्या गेल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री सीम चोवा मीन यांच्या जागांचाही समावेश आहे.
असा आहे निकाल
अरुणाचल प्रदेश
एकूण जागा- 60
भाजप 46
एनपीएपी 5
एनसीपी -3
पीपीए -2
काँग्रेस -1
अपक्ष -3
2019 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने अरुणाचल प्रदेशात बहुमताने सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने 41 जागांवर विजय नोंदवला होता. यानंतर जनता दल युनायटेडने 7, नॅशनल पीपल्स पार्टी 5, काँग्रेस 4 आणि अरुणाचल प्रदेश पीपल्स पार्टीने 1 जागा जिंकली. इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या.
अरुणाचलमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री पेमा खांडू यांना जाते. पेमा खांडू यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. पण 16 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी काँग्रेस विरुद्ध बंड केले आणि भाजपचा सहयोगी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (PPP) मध्ये सामील झाले. त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले. 2019 मध्ये भाजपने प्रचंड विजय मिळवला आणि पेमा खांडू यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. आता पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत
