मुख्यमंत्र्यांच्या बॅगची तपासणी


संजय राऊत याना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर
नाशिक:
लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसेवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी पुन्हा नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे आज हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले. मात्र, त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली.या बॅगांमध्ये कॅमेराचे साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या. संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आलेले नाहीत. या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रितसर शुटिंगही केले आहे. एकनाथ शिंदे यांनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठरवून केलेली नौटंकी आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ बॅगांमध्ये 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये घेऊन आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!