अक्षय्य तृतीयेला या गोष्टी करा दान
सातारा
अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी परंपरेनुसार लोक घरी लक्ष्मीची पूजा करतात आणि सोनं खरेदी करतात. या दिवशी सुरू केलेल्या एखाद्या नव्या गोष्टीला अक्षय्य असं यश मिळतं आणि धार्मिक कार्य केली तर अक्षय्य पुण्य मिळतं, असं मानलं जातं.अक्षय्य तृतीयेला दान केलं तर त्याच्या कितीतरी पट अधिक त्याचं फळ मिळतं, असंही मानलं जातं. यंदा अक्षय्य तृतीया शुक्रवार 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कोणतं कार्य केल्यावर यश, धन आणि वैभव मिळतं तसंच काय दान करायचं याविषयी धर्मशास्त्रात माहिती आहे
अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मशास्रानुसार प्रचंड शुभ दिवस मानला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी दान केल्याने अक्षय्य पुण्य मिळतं. अक्षय तृतीयेला सातु, गहू, चणे, दही, तांदुळ, फळं आणि इतर धान्य दान करावं.
पाण्याचं दान
सृष्टीतील जीवमात्रांना पाणी प्यायला दिल्याने खूप पुण्य मिळतं, अशी हिंदू धर्मातली धारणा आहे. माणसाला पाणी प्यायला देणं म्हणजेच जलदान करणं हे सर्वात महत्त्वाचं दान आहे. पाणपोई उभारण्यासाठी तुम्ही दान करू शकता. लोकांना स्वच्छ पाणी प्यायला उपलब्ध करून देण्यासाठी पाणपोई पण उभारू शकता. स्कंन्द पुराणानुसार, अक्षय्य तृतीयेला जलदान केलं तर महापुण्य प्राप्त होतं. तसंच शिवलिंगावर मटकीचं दान केलं तर ते चांगलं मानलं जातं.
पादत्राणे दान
अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यात येते, त्यामुळे हवामान प्रचंड गरम असतं. त्यामुळे लोकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी व्यवस्था करणं, छत्री वाटणं, पंखा दान करणं किंवा चपलांचं दान करणं हे खूप पुण्याचं काम मानलं जातं. अशाप्रकारे तुम्ही अक्षय्य तृतीया साजरी केली तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ शकते. उन्हाचा चटका बसत असताना काही कष्टकरी माणसाला चप्पल वापरायला मिळाली तर तो नक्कीच आनंदी होऊन तुम्हाला अनेकानेक आशीर्वाद देईल. तहानेलेल्याला पाणी मिळालं तर तो जे आशीर्वाद देईल त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल
