अंनिसचे ज्योतिषांना आव्हान


लोकसभा निकालाचे भविष्य सांगा आणि २१ लाख रुपये जिंका

सातारा
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.या लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्दा निर्मूलन समितीने ज्योतिषांना दिले आहे.
प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी निवडणूक निकालांचे भाकीत वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे, अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायंगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली समितीने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अभ्यासकांना नसून ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.
या लोकसभा निवडणुकीसाठीही अंनिसमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाच्या हेतूने राबवली जात आहे. आव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱया ज्योतिषांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल.
या प्रश्नावलीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी.शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मल्होत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील ?
कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदारसंघातून कोण विजयी होईल ?
वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील ?
संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील ?
कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ?
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल ?
या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.

Advertisement

तसेच राजकीय भविष्य सांगण्यासाठी उमेदवाराची जन्म कुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांचा वापर करून वर्तवलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला शुभ मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे यापैकी अशी कोणती ज्योतिष पद्धत वापरली यांची माहिती ज्योतिषांनी देणे अत्यावश्यक आहे. एकूण शंभर गुणांच्या प्रश्नावलीत चार प्रमुख प्रश्न असून प्रत्येक प्रश्नांतर्गत काही उपप्रश्न आहेत. प्रत्येक योग्य उत्तरला पाच गुण देण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.

या आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला पाच हजार रूपये प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डीडी) सीलबंद पाकीटातून दि. २५ मे पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर, सांगली – 416416 या पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवडयांच्या आत परीक्षक समितीच्यावतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील, असे पत्रकात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!