केजरीवाल याना अखेर तुरुंगात इन्सुलिन
शुगर लेव्हल ३२० वर गेल्याने उपचार
नवी दिल्ली
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना अखेर सोमवारी तुरुंगात इन्सुलिन देण्यात आलं. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढत होतं. साखरेचं प्रमाण ३२० वर पोहोचलं होतं. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आलं.
केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास असून आप नेत्यांनी दावा केला होता की, तुरुंगात डांबल्यापासून केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ३२० पर्यंत गेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं वजनदेखील घटलं आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी इन्सुलिनची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी त्यांना इन्सुलिन देण्यात आलं. तत्पुर्वी केजरीवाल यांना औषधं आणि इन्सुलिन दिलं जात नसल्याने आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. आप पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांनी तुरुंग प्रशासनाची भेट घेऊन त्यांची मागणी मांडली. तसेच तुरुंगाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.
केजरीवाल यांच्या तब्येतीवरून, डाएटवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ चालू आहे. एका बाजूला आप नेते आरोप करत आहेत की, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत आहे. त्यांना त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांना समोरासमोर भेटू दिलं जात नाही. त्यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीस) त्रास असून तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजनदेखील झपाट्याने कमी होतं आहे. केजरीवाल यांना त्यांची नेहमीची औषधंदेखील दिली जात नसल्याचा आरोप आपने केला आहे. यावरून गोंधळ चालू असतानाच केजरीवाल यांनी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, तुमची वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया वाचून मला वाईट वाटलं. तुम्ही म्हणालात की, मी कधीही इन्सुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र हे संपूर्णपणे खोटं आहे. मी दररोज हा मुद्दा उपस्थित करतोय. माझ्य इन्सुलिनची आठवण करून देतोय. माझी शुगर वाढली आहे. मी ग्लुको मीटरही डॉक्टरांना दाखवलं. माझी शुगर लेव्हल २५० ते ३२० पर्यंत वाढली आहे तर फास्टिंग शुगर १६० ते २०० च्या पातळीवर जातं आहे.
