लता चव्हाण यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सातारा
कवयित्री लता चव्हाण यांच्या “इतकंच ” या समीक्षा प्रकाशन पंढरपूर यांनी प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ अभ्यासक मा किशोर बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड सीमंतिनी नूलकर आणि प्रा श्रीधर साळुंखे उपस्थित होते. या सोहळ्याच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा श्रीधर साळुंखे म्हणाले, कवयित्रीच्या जगण्याचा हुंकार म्हणजे हा काव्यसंग्रह असून यातील भाषा सहजसुंदर, सोपी आहे.
अॅड सीमंतिनी नूलकर म्हणाल्या, कवयित्रीचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा काव्यसंग्रह असून कवयित्री जे जगते तेच आपल्या कवितेत मांडते. या कवितेत कुठेही नकारात्मकता, निराशा, जगण्यातील खंत जाणवत नाही, स्त्रीचे आयुष्य, सोशिकता, छळ, अन्याय, यातना याही पलीकडे जाऊन कवयित्री आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघते.
अध्यक्षीय भाषणात मा किशोर बेडकिहाळ म्हणाले, कवयित्री लता चव्हाण यांच्या कवितेत निसर्ग,पाऊस, नातीगोती,सर्वसामान्यांचे जगणे, शेतकरी, शेतीमाती असे सर्व विषय हाताळले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही मोठा आनंद दडलेला असतो हे सांगणारी कविता आहे आणि कवयित्रीची आनंदी वृत्ती, सच्चेपणा या कवितांमधून व्यक्त होतो.
कवयित्री लता चव्हाण यांचे वडील निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मण पोफळकर, आई शेवंता पोफळकर, काव्यसंग्रहाचे मुद्रितशोधन करणा-या डॉ अ्दिती काळमेख, रेखाचित्रकार रमेश डफळ यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगकर्मी, कवी चंद्रकांत कांबिरे यांनी केले. सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले, आभार प्रदर्शन श्रीमंत शेळके यांनी केले.
