श्रीमंत शाहू छत्रपती अब्जाधीश
प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश
कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा सातारा आणि कोल्हापुरात राजघराण्याचे वारसदार निवडणुकांच्या मैदानात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्या उमेदवारी अर्जासोबत एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांवर कसलेही कर्ज नाही.
शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख व 23 कोटी 71 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. 122 कोटी 88 लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन आहे.
शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.कोल्हापूर मतदारसंघातील शाहू छत्रपतींचे प्रतिस्पर्धी आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये एवढी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत 2019 च्या तुलनेत तब्बल 5 कोटी 65 लाख रुपयांची वाढ झाली आहे. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख 32 हजार 525 रुपये असल्याचे म्हटले आहे. तर, 13 कोटी 21 लाख 95 हजार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी विवरणपत्रात नमूद केले आहे.
