भाजप उमेदवारावर सुनेचे गंभीर आरोप
रामदास तडस यांच्याविरोधात पूजा तडस यांची उमेदवारी
नागपूर
वर्धा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्याविरोधात त्यांच्या स्नूषा पूजा तडस यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर त्या अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि पूजा तडस यांनी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन खासदार रामदास तडस यांच्यावर आरोप केले. पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पूजा तडस यांनी म्हटलं की, मोदीसाहेब म्हणतात की संपूर्ण देश हा माझा परिवार आहे. त्याच परिवारातल्या एका व्यक्तीच्या म्हणजेच रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मोदीजी वर्ध्यात येणार आहेत. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा. आता मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष म्हणून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”
पूजा तडस यांच्या आरोपांबाबत बोलताना खासदार रामदास तडस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आता निवडणुका आल्या की सगळेजण गंभीरआरोप करत राहतील. पूजा तडस यांचं प्रकरण कोर्टात आहे. माझा मुलगा आणि ती मुलगी यांनी लग्न केल्याचं मला माहिती नाही. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेले. आता निवडणुका आल्या की हे असे आरोप होत राहतील. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.विरोधकांना हाताशी धरून आता तिने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
