मंडलिकांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया


राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही:शरद पवार

Advertisement

पुणे
कोल्हापूरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआ उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद झाला आहे आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत
आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर शरद पवारांनी राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही असं भाष्य केले आहे.मंडलिक यांच्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहावं. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका आत्ताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तिमत्वावर टीका केली जात आहे. यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहेत. छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदींच्या गादीचा मान राखायचा का? असं यांना वाटतंय का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
त्याचसोबत डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलं आहे आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जे ज्यांनी वक्तव्य केले ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक हे डुप्लिकेट माल आहेत, त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची गादी आहे, त्या गादीविषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे अशा शब्दात राऊतांनी संजय मंडलिकांना फटकारलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!