जगाला प्रेम अर्पावे
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
अनेक देशात वाढतोय पॉकेट फॉरेस्टचा ट्रेंड
नेहमीच्या जंगलापेक्षा दहा पट वेगाने होते वाढ

वॉशिंग्टन
जगातील सर्वच खंडातील बहुतेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आता तोडीमुळे निर्माण झालेला हा पर्यावरणाचा असमतोल ठीक करण्यासाठी आता पॉकेट जंगलचा ट्रेड जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाला आहे छोट्या प्रमाणात जंगल विकसित करण्याचा हा प्रकल्प असून अशा प्रकारे जी जंगले विकसित करण्यात येतात त्यांचा वाढीचा वेग नेहमीच जंगलांपेक्षा दहा पट जास्त असतो आशिया खंडातील भारत जपान चीन या प्रमुख देशांसह इतर सर्वच खंडातील देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पॉकेट फॉरेस्ट, मिनी फॉरेस्ट या कल्पना उदयास येऊ लागल्या आहेत आणि त्या अस्तित्वातही आल्या आहेत जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी झाडे लावून जंगल विकसित करण्याच्या संकल्पनेला पॉकेट फॉरेस्ट असे म्हटले जाते मोठ्या इमारतींचे पार्किंग एरियाज असो किंवा शाळांची मैदाने असोत किंवा ज्या ठिकाणी कचरा जमा केला जातो अशा जागा असोत अशा सर्व परिसरामध्ये जंगल विकसित करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त प्रकाशीत केले असून त्यात दिलेल्या माहितीप्रमाणे नेहमीच्या जंगलापेक्षा या पॉकेट जंगलांची वाढ 10 पट जास्त वेगाने होते एवढेच नाही तर ही पॉकेट जंगले नेहमीच्या जंगलापेक्षा 30 टक्के जास्त घनदाटही असू शकतात विकसित केलेल्या पॉकेट फॉरेस्टमध्ये जैवविविधतेचे प्रमाणही 100 पट जास्त असते त्यामुळे हवेतील कार्बन शोषून घेण्याची क्षमता या जंगलांमध्ये जास्त असते शहरी भागात विकसित करण्यात आलेल्या अशा पॉकेट फॉरेस्टमुळे शहरांच्या तापमानातही घट झाल्याचे लक्षात आले आहे एवढेच नव्हे तर अशा प्रकारे विकसित करण्यात आलेल्या जंगलांना पाणी खूप कमी लागते जपानमधील पर्यावरणवादी अकिरा मियावाकी यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्यांनी एका उजाड माळरानावर अशा प्रकारे जंगल विकसित केले त्यानंतर ही पॉकेट फॉरेस्ट किंवा टायनी फॉरेस्टची संकल्पना जगभरात सर्वत्र पसरली विशिष्ट प्रकारे जाणीवपूर्वक प्रयत्न करून वृक्षारोपण करणे आणि त्या वृक्षांचे संवर्धन करणे हा उद्देश या संकल्पनेमागे आहे मध्ये घरामध्ये जे किचन गार्डनिंग किंवा टेरेस गार्डनिंग होते त्यापेक्षा ही संकल्पना वेगळी असून पृथ्वीवरील जंगलाचे क्षेत्र वाढवणे हा एकमेव उद्देश या संकल्पनेमागे आहे
न्यूजमंडी/ज्ञानकोश
अविश्वास ठराव
लोकसभेच्या कामकाजाच्या नियम आणि संहितेच्या 198व्या नियमानुसार हा ठराव आणण्यासाठी एखाद्या सदस्याला लोकसभेच्या किमान 50 सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याची गरज असते.त्या सदस्याला मग लोकसभेच्या अध्यक्षांना सकाळी 10च्या आधी प्रस्तावाची तशी सूचना द्यावी लागते. मग लोकसभेचे अध्यक्ष ती सभागृहात वाचून दाखवतात आणि किमान 50 सदस्यांचा त्याला पाठिंबा आहे, याची खात्री करतात.
तो पाठिंबा सिद्ध झाल्यावर अध्यक्ष त्या प्रस्तावावर चर्चेसाठी एक तारीख निश्चित करतात, जी पुढच्या 10 दिवसांत असावी लागते, नाहीतर तो ठराव रद्दबातल ठरतो. अर्थात त्या ठरलेल्या दिवशी सभागृहात प्रदीर्घ चर्चा होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रकरणावर आपापली मतं मांडतात, गदारोळही होतो आणि दिवसाअंती अविश्वास प्रस्तावावर मतदान होतं, ज्यावरून सरकारचं भवितव्य ठरतं.
खासदारांनी पक्षाच्या भूमिकेनुसारच मतदान करावं, यासाठी पक्ष व्हिप अर्थात पक्षादेशही जारी करू शकतात.
जर सरकारवर अविश्वास दाखवणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर त्या सरकारला पुरेसा पाठिंबा नाही आहे, हे सिद्ध होऊन सरकार कोसळू शकतं. असं इतिहासात झालंसुद्धा आहे

न्यूजमंडी/सुविचार
१. आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा.
२. संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे? निर्णय तुमचा आहे.
३. साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

न्यूजमंडी/विनोद
फुटबॉल
नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
नवरा – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!
प्रसन्न
देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)
प्रवचन
पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
वाटली डाळ
लागणारे जिन्नस:
साहित्य:
चणा डाळ – दोन वाट्या हिरवी मिरची -२ (कमी तिखट) काश्मीरी तिखट -२ चमचे ओल खोबर – ३ ते ४ चमचे लिंबू -१
तिखट, साखर, मीठ चवीनुसार फोडणी साठी हळद, मोहरी, जिरे, हिंग आणि बारीक चिरलेला कढिपत्ता.
कृती:
प्रथम चणा डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर पाणी निथळून भरड वाटून घ्यावी. आता मिरची वाटून त्यात घालावी. दोन मोठे डाव तेल तापत ठेवावे. त्यात फोडणीच्य्या साहित्याची फोडणी करावी. त्यात काश्मीरी लाल तिखट घालावे. आता त्यात वाटलेली चणा डाळ घालावी. मीठ आणि साखर घालावी. आता चार ते पाच वाफा काढाव्यात. डाळ सुटी होईतोवर वाफवून घ्यायची आहे. गीचका वाटत असेल तर तेल घालावे आणि परत वाफ आणावी.पूर्ण सुटी झाली की त्यात लिंबू पिळावे. आणि सगळ्यात शेवटी ओले खोबरे घालावे. वाटली डाळ तयार.लिंबू साखर हवीच. वाफ आणताना गॅस मंद ठेवावा, डाळ खाली लागू शकते. ह्यासाठी तेल जास्तच लागते कारण त्याशिवाय डाळ मोकळी होणार नाही
