238 वेळा निवडणुकीत पराभव
लिम्का विक्रम पुस्तकात नाव
नवी दिल्ली
जगातील कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत जिंकण्यासाठीच उतरत असतात. पण तामिळनाडूतील एक उमेदवार मात्र त्याला अपवाद आहे. ही व्यक्ती निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर हरण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरते. या व्यक्तीने आतापर्यंत 238 वेळा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. म्हणजे तो 238 वेळा पराभूत झाला आहे. तरीही ही व्यक्ती लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उतरणारच आहेत. तामिळनाडूमधील के पद्मराजन हे निवडणूक आली की सक्रिय होतात. 65 वर्षीय पद्मराजन यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांचे नशीब आजमावणार आहेत. तामिळनाडूमधील मेट्टूरचे पद्मराजन यांचा टायर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 1988 पासून ते निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते धर्मपुरी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. इलेक्शन किंग नावाने प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी राष्ट्रपती निवडणुकीत सुद्धा नशीब आजमावलं आहे.
पद्मराजन हे पहिल्यांदा निवडणूक आखाड्यात उतरले. तेव्हा लोकांनी त्यांची टर उडवली. त्यांच्यावर लोक हसले. सामान्य नागरिकाने निवडणूकीपासून चार हात लांब असावे, असा समज आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्ती कधी निवडणूक लढवू शकत नाही, या समजाला त्यांनी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा छेद दिला. या मानसिकतेविरोधात त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. पद्मराजन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीपासून ते मोदीपर्यंत त्यांनी अनेकांविरोधात निवडणूक लढवली. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे.पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. ते भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार ठरले आहेत.
