शिवसेनेच्या यादीवरून काँग्रेस नाराज


थोरात, वडेट्टीवारांना आठवला आघाडीधर्म; राऊत म्हणाले,चर्चा संपली
मुंबई
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांनी ठाकरेंना आघाडीधर्माची आठवण करुन दिली आहे काँग्रेसमध्ये नाराजीची लाट उसळलेली असताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे सेनेनं चार जागा लढवण्यात गैर नाही. आम्ही कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली. तिथे गेल्या निवडणुकीत सेनेचा उमेदवार निवडून आला. कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा घेतली. आता यावर अजून किती चर्चा करणार? आमच्या दृष्टीनं चर्चा संपली, असं राऊत म्हणाले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भानं चर्चा करत आहोत, काँग्रेस त्या जागांबाबत आग्रही आहोत. अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणं योग्य नाही. आघाडीधर्माचं पालन सगळ्यांनीच करायला हवं असं माझं मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेनं या जागांवर फेरविचार करावा,’ असं आवाहन थोरात यांनी केलं.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उद्धव ठाकरेंना आघाडीधर्माची आठवण करुन दिली आहे. ‘महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले. त्यांनी आघाडीधर्म पाळला असता तर बरं झालं असतं. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्यानं आघाडीधर्माला गालबोट लागलं आहे. त्यांनी यावर पुनर्विचार करावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम यांनीही ठाकरेंच्या यादीवर आक्षेप नोंदवत उघड नाराजी व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!