तोतया महिला पोलिसाला अटक


पोलीस बनून वर्षभर वावर,महिला दिनी सत्कारही झाला

Advertisement

हैदराबाद
हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होती. मालविका नालगोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे. वर्षभर ती सगळीकडं पोलिसाच्या गणवेशातच जायची आणि पोलिस असल्यासारखंच वागायची.
ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची, सोहळ्यांमध्ये तसंच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरांतही पोलिसाच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची.
पण तिनं जेव्हा स्वतःच्या साखरपुड्यातही पोलिसाचाच गणवेश परिधान केला, तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला. त्यामुळे तिचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलं.पण जवळपास एक वर्ष पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली
जदाला मालविका ही महिला नालगोंडा जिल्ह्याच्या नरकटपल्लीमधील जदाला यादैया यांची मुलगी आहे. मालविका हिचं लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. तिच्या आई-वडिलांचीही तिनं पोलीस अधिकारी व्हावं अशी इच्छा होती.मालविकानं निजाम कॉलेजमधून एमएससी पूर्ण केलं. 2018 मध्ये तिनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मध्ये एसआय पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला.पण, दृष्टीतील काही समस्येमुळं शारीरिक क्षमता चाचणीत ती उत्तीर्ण झाली नाही. त्यामुळं तिनं लेखी परीक्षाही दिली नाही.पण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मात्र ती लेखी परीक्षेत पास झाली असून लवकरच तिला नोकरीही मिळणार आहे, असंच वाटत होतं. तिनंही आई-वडील आणि नातेवाईकांना गेल्या वर्षीच नोकरी मिळाली, असं सांगितलं. तांत्रिक अडचणींमुळं पगार मिळत नसून, लवकरच तोही मिळेल, असं तिनं सांगितलं होतं,” अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या एसपी शेख सलिमा यांनी दिली.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मालविका एका वर्षापासून नालगोंडा-सिकंदराबाद मार्गावर तोतया एसआय (सब इन्सपेक्टर) बनून प्रवास करत होती. तिनं 3 जानेवारी 2019 ला बनावट ओळखपत्र तयार करून घेतलं होतं. मालविकानं 8 मार्चला नालगोंडामधील एमईएफ संस्थेद्वारे आयोजित महिला दिनाच्या सोहळ्यातही सहभाग घेतला होता. त्या सोहळ्यातही ती पोलिसांच्या गणवेशातच सहभागी झाली होती. संस्थेच्या सदस्यांकडून तिचा सन्मान करण्यात आला होता.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालविकाचा साखरपुडा नारकेटपल्लीमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाशी झाला. तो आयटी क्षेत्रात जॉब करत होता. पण मालविका साखरपुड्यातही पोलिसाचा गणवेश परिधान करूनच पोहोचली. त्यामुळं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला.
त्यानंतर हे सर्वप्रकरण समोर आलं. बीबीसीबरोबर बोलताना एसपी शेख सलिमा म्हणाल्या की, “सोहळ्यानंतर सामान्य पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडं चौकशी केली. मालविका नावाचं कोणी आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर आरपीएफ, नालगोडा आरपीएफ असा ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर या नावाची कोणीही व्यक्ती नसल्याचं विशेष शाखेनं पोलिसांना कळवलं.”
त्याचबरोबर, “विशेष शाखेच्या पोलिसांनी 10 दिवस तिच्यावर पाळत ठेवली. मालविका कुठे जाते.. काय करते.. यावर पाळत ठेवत अतिशय गोपनीय पद्धतीन आरपीएफच्या महानिरीक्षकांना त्याबाबत अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या आदेशावर सिकंदराबाद जीआरपी पोलिसांनी तिला अटक केली.”मालविका 19 मार्चच्या सकाळी नालगोंडा रेल्वे स्टेशनवर तपासणीची तयारी करत असताना तिला अटक केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं.
मालविकाच्या विरोधात आयपीसीच्या कलम 170, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!