भारताला एक देश मानण्यास ए राजा यांचा नकार
अनेक वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा चर्चेत
नवी दिल्ली:
तामिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए राजा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले असून एका सभेत बोलताना त्यांनी भारताला एक देश मानण्यास नकार दिला. ३ मार्च रोजी तामिळनाडूत मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्या वाढदिवसा निमित्त कोयंबतूर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.एक देश याचा अर्थ एक भाषा, एक संस्कृती आणि एक परंपरा असा होतो. अशा गोष्टी एक असतील तरच त्याला देश म्हटले जाते.
भारत एक उपखंड आहे. कारण इथे अनेक परंपरा, संस्कृती आहेत. तामिळनाडूमध्ये एक भाषा आणि एक संस्कृती आहे, हा एक देश आहे. मळ्याळम एक भाषा आहे, त्याचे एक राष्ट्र आहे. ओडिसा एक देश आहे, त्यांची एक भाषा आहे. केरळमध्ये वेगळी दिल्लीत वेगळी भाषा आणि संस्कृती आहे. या सर्व गोष्टी मिळून भारत होतो. यामुळेच भारत एक देश नाही तर एक उपखंड आहे असे त्यांनी म्हटले आहे
या सभेत राजा यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. ते म्हणाले मणिपूरमध्ये श्वानाचे मांस खाल्ले जाते. ती त्यांची संस्कृती आहे. यात चुकीचे असे काहीच नाही. या गोष्टी फक्त आपल्या डोक्यात आहेत. काश्मीरची संस्कृती वेगळी आहे. त्याचा आपण स्विकार केला पाहिजे. काही जण बीफ खातात, यामुळे तुम्हाला का अडचण होते? असा सवला करत जे लोक बीफ खातात त्यांनी तुम्हाला खाण्यास सांगितले का? विविधतेत एकता आहे. आपण सर्वजण वेगळे आहोत हे मान्य करा.
राजा यांच्या या भाषणाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेत आले आहेत. ज्यात ते म्हणतात, जर तुम्ही म्हणत असाल की अमुक एक तुमचे देव आणि भारत माता की जय म्हटले पाहिजे, तर आम्ही त्या देवाला आणि भारत मातेला कधीच स्विकारणार नाही. हवं तर आम्ही सर्व श्री रामाचे शत्रू आहोत असे समजा. माझा रामायण आणि श्री रामावर विश्वास नाही. इतक नाही तर ए राजा यांनी हनुमानाची तुलना वानराशी करून ‘जय श्री राम’ ची घोषणा घृणास्पद असल्याचे म्हटले.
वादग्रस्त वक्तव्य करण्याची राजा यांची ही पहिली वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी त्यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्ही शी केली होती. तर मुख्यमंत्री स्टालियन यांचा मुलगा उदयनिधीने सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोनाशी केली होती.
